Thursday, May 2, 2024
Homeनगरश्रीरामपूरचे दोन सोनसाखळी चोर जेरबंद

श्रीरामपूरचे दोन सोनसाखळी चोर जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरासह श्रीरामपूर येथील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणारे दोघे सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहेत. त्यांच्याकडून साडे पाच तोळे सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा चार लाख 31 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

- Advertisement -

प्रफुल्ल अशोक जाधव (वय 24 रा. निपाणीवडगाव ता. श्रीरामपूर), विष्णु दत्तात्रय गवारे (वय 25 रा. अशोकनगर ता. श्रीरामपूर) असे जेरबंद केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांच्यावर श्रीरामपूर शहर, राहुरी, कोतवाली, तोफखाना, सिलेगाव (जि. छत्रपती संभाजीनगर) पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यातील दोन, कोतवाली पोलीस ठाण्यातील एक व श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील एक अशा चार दाखल गुन्ह्यांची कबुली दिली आहे. दरम्यान, त्यांचे साथीदार कुणाल जाधव व मनोज जामदार पसार झाले आहेत. त्यांचाही शोध एलसीबीकडून घेतला जात आहे.

राधिकाबाई शंकर दंडवते (रा. सावेडी) या सावेडी उपनगरातून रस्त्याने पायी घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील 30 हजारांचा सोन्याचा सर बळजबरीने चोरून नेला होता. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना शहरासह जिल्ह्यात होत असलेल्या सोन साखळी चोरीच्या वाढत्या घटनाबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार निरीक्षक आहेर यांनी गुन्हेगारांचा शोध घेण्याबाबत पथक रवाना केले. पथकाने माहिती घेतली असता कुणाल जाधव व मनोज जामदार यांनी नगर शहर व श्रीरामपूर परिसरात सोन साखळी चोरी करून चोरी केलेले महिलांचे गळ्यातील सोन्याची दागिने प्रफुल्ल जाधव व विष्णु गवारे यांचेकडे आहेत व ते विक्री करण्यासाठी अशोकनगरहुन श्रीरामपूरकडे येणार आहे. अशी माहिती त्यांना मिळाली.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार भाऊसाहेब काळे, मनोहर शेजवळ, विजय वेठेकर, मनोहर गोसावी, विजय ठोंबरे, सचिन आडबल, शंकर चौधरी, शिवाजी ढाकणे, रणजीत जाधव, मेघराज कोल्हे, आकाश काळे, चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने सापळा रचून प्रफुल्ल जाधव व विष्णु गवारे यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. व इतर दोघांचा शोध घेतला असता मात्र ते मिळून आले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या