नाशिक | प्रतिनिधी Nasik
आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 च्या अनुषंगाने सुरक्षितेला प्रथम प्राधान्य देवून आपत्ती व्यवस्थापनेच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी आवश्यक साहित्याचे तपशीलवार प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बैठकीत दिल्या.
आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित सिंहस्थ कुंभमेळा अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीत जिल्हाधिकारी जलज शर्मा बोलत होते. यावेळी नाशिक महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. श्रेया देवचक्के, पर्यटन उपसंचालक मधुमती सरदेसाई, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले की, प्रयागराज दौरा दरम्यान केलेल्या पाहणी व अभ्यासानुसार आपत्ती व्यवस्थापनास प्राधान्य देवूनच सिंहस्थ कुंभमेळा नियोजन करण्यात येणार आहे. यात नाशिक महानगरपालिका, नाशिक व त्र्यंबकेश्वर नगर परिषद यांच्यासह इतर यंत्रणांनीही आवश्यक साहित्याची तपशिलवार प्रस्ताव तातडीने सादर करावेत, आपत्ती व्यवस्थापनात काम करतांना घटना प्रतिसाद प्रणाली कार्यान्वित करावी. यासाठी टास्क फोर्स स्थापित करून कामात सुसूत्रता येण्यासाठी प्रत्येक विभागासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्त करण्यात यावेत. कुंभमेळात नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येणारे भाविक लगतच्या जिल्ह्यांतील धार्मिक स्थळांनाही भेट देतील, त्यादृष्टीने छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर व लगतचे इतर जिल्ह्यांतील नगरपरिषद व देवस्थान ट्रस्ट तसेच रेल्वे प्रशासन यांना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारण यांच्यामार्फत पत्र देवून याबाबत अवगत करावे व त्यांचे सूचक अभिप्राय घेण्यााबाबत जिल्हाधिकारी शर्मा यांनी सूचित केले.
वातावरणातील बदल लक्षात घेता आता तापमान वाढत आहे. त्यामुळे उष्माघाताच्या अनुषंगानेही येत्या आठवडाभरात आराखडा व प्रस्ताव संबंधित यंत्रणांनी सादर करावा. सिंहस्थ कुंभमेळाच्या दृष्टीने इतर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महानगरपालिका व नगरपरिषद यांच्याकडील उपलब्ध असलेल्या सुरक्षितता उपकरणांची यादी मागविण्यात यावी. जेणेकरून आवश्यकतेनुसार आपत्तीच्या काळात त्या साहित्याची मागणी करणे सोयीचे होईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत संबंधित विभागांनाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी वायरलेस ट्रेनिंगचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिल्या.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सर्व अधिकारी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नाशिक यांना सूपूर्द करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देशपांडे यांनी बैठकीत सांगितले.