नाशिक, दि. १८ ऑक्टोबर (जिमाका वृत्तसेवा) :
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासह भक्तिभाव, जनजागृती आणि सामाजिक सहभाग वाढविण्यासाठी ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर दोन विश्वविक्रमांचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. याअंतर्गत २५ ऑक्टोबर रोजी यशवंत महाराज पटांगण येथे ५०१ जणांचा सामूहिक शंखनाद, तर ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण सोहळ्याच्या दिवशी रामकुंड येथे सुमारे ६ हजार ५०० जनजाती बांधवांच्या सहभागातून सामूहिक गंगा-गोदावरी आरती आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, भक्तिचरण दास महाराज, रामतीर्थ गोदा सेवा समितीचे जयवंत गायधनी, गोदा आरतीचे समन्वयक प्रदीप बच्छाव आदी उपस्थित होते.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळ्याचा संदेश जिल्ह्यातील गावागावांत पोहोचविण्यासाठी विविध सेवाभावी संस्था, समित्या आणि नागरिकांना सोबत घेऊन हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. पहिला विश्वविक्रम अनंत विजय शंखनाद ग्रुपच्या सहकार्याने २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत यशवंत महाराज पटांगण येथे करण्याचे नियोजन आहे. या उपक्रमात ५०१ जण सामूहिक शंखनाद करणार आहेत. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याच्या वेळीही शंखनाद करण्यात येणार आहे.
दुसऱ्या उपक्रमांतर्गत रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या सहकार्याने ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी रामकुंड येथे सामूहिक गंगा-गोदावरी आरती करण्यात येणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील जनजाती बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, गावागावांत प्रशिक्षण आणि नियोजन सुरू आहे. अहिल्याबाई होळकर पुलापासून रामकुंड परिसरापर्यंतचा भाग आरतीसाठी राखीव ठेवण्याचे नियोजन आहे.
रामकुंड परिसराच्या स्वच्छतेसाठी महानगरपालिकेचे सहकार्य
महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी रामकुंड घाटाचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यासह या उपक्रमासाठी महानगरपालिकेकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले. भाविकांची उपस्थिती आणि कार्यक्रमाचे स्वरूप लक्षात घेऊन परिसराच्या व्यवस्थापनाला महत्त्व देण्यात येणार आहे.
६ हजार ५५९ जणांची नोंदणी
गोदा आरतीचे समन्वयक प्रदीप बच्छाव यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील ६५० गावांतील तसेच शहरातील २८ वस्त्यांमधील नागरिकांचा या उपक्रमात सहभाग राहणार आहे. जनजाती बांधवांकडून कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. या उपक्रमासाठी आतापर्यंत ६ हजार ५५९ जणांची नोंदणी झाली असल्याची माहिती जयवंत गायधनी यांनी दिली. तर श्रीमती वृषाली यांनी शंखनाद कार्यक्रमाची माहिती दिली.




