पंचवटी | प्रतिनिधी
आडगाव येथील इंग्लिश मीडियम स्कूलजवळील पुलाखाली रविवारी (दि. १८) दुपारी जुन्या वादातून एका तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने तरुणावर पिस्तुलातून दोन वेळा गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही वेळा गोळीबारासाठी वापरण्यात आलेले शस्त्र मिसफायर झाल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत फिर्यादी उमेश ऊर्फ कैलास माळोदे हे बालंबाल बचावले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित राहुल आंबेकर याने त्याच्याकडील बंदुकीतुन फिर्यादी उमेश ऊर्फ कैलास माळोदे यांच्यावर दोन वेळा गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही वेळा फिर्यादीने गोळी चुकविल्यामुळे त्यामुळे माळोदे यांना कोणतीही दुखापत झाली नाही. या घटनेनंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, या घटनेमागे काही महिन्यांपूर्वी संशयित राहुल आंबेकर आणि फिर्यादीची पत्नी एकाच कंपनीत काम करत होते. यावेळी संशयिताकडून पत्नीला त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे. यावरून फिर्यादीने काही महिन्यांपूर्वी संशयिताला जाब विचारला होता. त्यानंतर पत्नीने संबंधित कंपनीतील कामही बंद केले होते. याच घटनेचा राग मनात धरून संशयिताने रविवारी संधी साधत फिर्यादीवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे.या प्रकरणात एकूण दोन संशयितांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे संशयित नाशिक रोड-जेलरोड परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ च्या मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, पोलीस हवालदार निलेश काटकर यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मिसफायर झालेल्या शस्त्रातील दोन्ही कॅप ताब्यात घेतले. संशयितांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून, पुढील तपास आडगाव पोलीस करत आहेत.
“जुन्या वादातून संशयित राहुल आंबेकर याने उमेश माळोदे यांच्यावर दोन वेळा गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शस्त्र मिसफायर झाल्याने फिर्यादी सुरक्षित आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच संशयितांना ताब्यात घेतले जाईल.”
शेखर देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त




