अहिल्यानगर (प्रतिनिधी)
शेतकर्यांच्या मागणीचा विचार करून सीना मध्यम प्रकल्पातून काल, सोमवारपासून (16 मार्च) उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांना याबाबत सूचना दिल्या होत्या.
मे 2025 मध्ये अवकाळी पावसामुळे सीना नदीची उपनदी असलेल्या वाळूंबा नदीला आलेल्या पुरामुळे सीना मध्यम प्रकल्प जून 2025 मध्ये पूर्ण क्षमतेने भरला होता. त्यानंतर सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामात पाण्याची विशेष मागणी झाली नव्हती. मात्र मार्च 2026 मध्ये उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्याने सीना मध्यम प्रकल्पाच्या माही-जळगाव परिसरातील शेतकर्यांनी उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. या मागणीसंदर्भात शेतकर्यांनी ना. विखे पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले होते.
त्यानंतर सीना मध्यम प्रकल्पातील उपलब्ध पाणी साठा विचारात घेऊन 16 मार्चपासून आवर्तन सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या व याबाबत कुकडी सिंचन प्रकल्पाच्या अधीक्षक अभियंता अलका अहीरराव तसेच कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे यांना आवश्यक निर्देश देण्यात आले. रब्बी आवर्तनाचा कालावधी संपत असतानाही केवळ शेतकर्यांच्या मागणीचा विचार करून उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता आवर्तन कालावधीत पाण्याचा अपव्यय होणार नाही याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना ना. विखे पाटील यांनी अधिकार्यांना दिल्या आहेत.
दरम्यान, अलनिनोच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने संभाव्य धोक्याचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणी साठा जपून वापरण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे सर्वच धरणांमधील पाण्याच्या वापराबाबत अधिकारी संवेदनशीलतेने नियोजन करून दक्षता घेतील, असे निर्देशही ना. विखे पाटील यांनी दिले.





