अहिल्यानगर/कर्जत |प्रतिनिधी| Ahilyanagar
कर्जत तालुक्यातील सीना मध्यम प्रकल्प (धरण) हे निर्मितीनंतर पहिल्यांदा 14 जून रोजी सकाळी सात वाजता ओव्हरफ्लो झाले आहे. धरणामध्ये आज रोजी 2. 400 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे धरणामधून 445 क्युसेक क्षमतेने विसर्ग सोडण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सीना पाटबंधारे विभाग उपविभाग मिरजगाव संदीपकुमार शेळके, सहाय्यक अभियंता संभाजी पवार व कालवा निरीक्षक प्रकाश जाधव यांनी दिली.
दरम्यान, नगर जिल्ह्यातील मुळा, भंडारदर आणि निळवंडे धरणात 29.33 टक्के पाणीसाठा असून दक्षिणेतील मध्यम प्रकल्प असणार्या सीनामध्ये 100 टक्के, आढळा 53.40 टक्के, मांडओहळमध्ये 61.48 टक्के, खैरी 30.71 टक्के आणि विसापूरमध्ये 73.82 टक्के असा एकूण 63.86 टक्के पाणीसाठा हा उपलब्ध असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.
जिल्ह्यात यंदा मे महिन्यांत जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाचे प्रमाण अधिक आहे. यात नगर, पारनेर, कर्जत, पाथर्डी, श्रीगोंदा आणि शेवगाव तालुक्यात हे प्रमाण सर्वाधिक आहे. या पावसामुळे कर्जत तालुक्यातील 21 गावांना, तसेच श्रीगोंदा तालुक्यातील व आष्टी तालुक्यातील गावांना वरदान असणारे सीना प्रकल्प हे जून महिन्यातच निर्मितीच्या 40 वर्षात प्रथमच ओव्हरफ्लो झाले आहे. या प्रकल्पाची निर्मिती 1984/85 यावर्षी झाली आहे. राज्यामध्ये पडलेल्या 1972 सालीच्या दुष्काळामध्ये सीना प्रकल्पाचे काम सुरू झाले होते. प्रकल्प पूर्ण झाल्यावर कधीच तो जून महिन्यात काठोकाठ भरला नव्हता. यावर्षी उन्हाळ्यामध्ये मे महिन्याच्या अखेरीस व जून महिन्याच्या सुरुवातीला प्रकल्पाच्या पानालोट क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला. यामुळे हा प्रकल्प निर्मितीनंतर प्रथमच 14 जूनला म्हणजे पावसाळा सुरू झाल्यानंतर अवघ्या सात दिवसांमध्ये भरले आहे.
दरम्यान, मागील वर्षी या काळात जिल्ह्यातील धरण आणि दक्षिणेतील मध्यम प्रकल्पात कमी पाणीसाठा होता. यंदा मात्र, जिल्ह्यातील धरणातील स्थिती चांगली दिसत आहे. जिल्ह्यात अजून सर्वदूर मोसमी पाऊस झालेला नाही. तसेच मूळा, भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाचे आगमन झालेले नाही. या ठिकाणी पाऊस सुरू झाल्यानंतर साधारण महिने ते दीड महिन्यांत म्हणजे 15 ऑगस्टच्या दरम्यान ही धरणे भरत असल्याचा अनुभव आहे. तर दक्षिणेतील मध्यम प्रकल्पात देखील त्यानंतर पाणीसाठा वाढत असतो. यंदा मात्र, वेगळे चित्र असून दक्षिणेत पावसाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसत आहे.
कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी
मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये कुकडी कालव्याच्या ओव्हरफ्लोने सीना प्रकल्प भरण्यात आला होता. यावर्षी मात्र, पावसाच्या पाण्यावर जून महिन्यामध्येच धरण ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये येणार्या निमगाव गांगर्डा, मिरजगाव, रातंजन, घूमरी, बेलगाव, बाबुळगाव, नागलवाडी, नागापूर, शितपूर, माही जळगाव, पाटेगाव, निंबोडी, टाकळी खंडेश्वरी, पाटेगाव, तरडगाव, नवसरवाडी,आनंदवाडी, मलठण, निमगाव डाकू व पाटेवाडी या गावांना होणार आहे.
जिल्ह्यातील धरण व प्रकल्पातील पाणीसाठा
भंडारदार 2401 (21.75 टक्के), मूळा 9146 (35.18 टक्के), निळवंडे 2584 (31.6 टक्के) तर मध्यम प्रकल्प असणार्या आढळा 565 (53.30 टक्के), मांडओहळ 245 (61.48 टक्के), सीना 2400 (100 टक्के), खैरी 164 (30.71 टक्के), विसापूर 668 (73.82 टक्के) असा पाणीसाठा आहे.
सीना प्रकल्पाचे काम 1872 ला सुरु झाले व 1984/85 साली पूर्ण झाले. निर्मितीनंतर प्रथमच 14 जून रोजी हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणामधून 445 क्युसेक क्षमतेने विसर्ग सोडण्यात आला आहे. जर आणखी पाऊस पडला तर जास्त प्रमाणामध्ये विसर्ग सोडावा लागेल. यामुळे प्रकल्प काठच्या व नदीपात्राच्या परिसरात शेतकर्यांनी व नागरिकांनी जाऊ नये.
– संदीपकुमार शेळके, उपविभागीय अभियंता, सीना प्रकल्प.





