सिन्नर | वार्ताहर Sinnar
शहराला पाणीपुरवठा करणार्या नगरपरिषदेच्या कडवा पाणीपुरवठा योजनेतील मुख्य पंपिंग स्टेशनवरील २ हजार केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने गेल्या पाच दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. नगरपरिषदेच्या ढिसाळ नियोजनाचा फटका नागरिकांना बसत असून ऐन दिवाळीच्या तोंडावर पाणी येत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
सिन्नर शहराला अनेक दिवसांपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. नंतर त्याचा कालावधी वाढत जाऊन तो आता पाच ते सहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. पाणीपट्टी वसुलीसाठी ज्या पध्दतीने तगादा लावला जातो, त्याच तत्परतेने पाणीपुरवठा व्हावा, ही नागरीकांची अपेक्षा आहे. नागरीकांकडून ३६५ दिवसांची पाणी पट्टी आकारली जात असतांना वर्षभरात १३५ ते १५० दिवसच पाणीपुरवठा होतो. त्यातही अतिशय कमी दाबाने हा पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यात वारंवार पाईप लाईन फुटणे, ट्रान्सफार्मर जळणे, वीज पुरवठ्यात बिघाड होणे या सबबी आता नागरिकांच्या अंगवळणी पडल्या आहेत. मात्र, त्याची झळ नागरीकांना कृत्रिम टंचाईच्या रूपाने बसत आहे.
शहर व उपनगरातील निर्माण झालेल्या ‘पाणीबाणी’ मुळे नागरिकांना आज महागडे पाण्याचे टँकर विकत घेण्याची वेळ आली आहे. शहर व उपनगरात पाणी पुरवठ्यात होणारा मोठा गोंधळ पहाता यांवर तातडीने प्रशासनाने लक्ष घालून ऐन दिवाळीत तहानलेल्या शहरवासीयांची होणारी फरफट थांबावी अशी मागणी होत आहे. दरम्यान, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सुचनेनूसार माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले व माजी नगरसेवक हर्षद देशमुख यांनी पंपिंग स्टेशनवरील नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरची पाहणी केली. ट्रॉन्सफॉर्मर दुरुस्त करण्यासाठी त्यांनी सेवकांना सुचना केल्या.
दारणातून पाणी मिळावे
कडवा योजनेआधी सिन्नरकरांना पळसे येथील दारणा नदीवरील पंपिंग स्टेशनवरुन पाणी आणण्यात येत होते. आजही एमआयडीसीसाठी या पाण्याचा उपयोग होतो. कडवा पंपिंग स्टेशनवरील ट्रॉन्सफॉर्मर दुरुस्त होईपर्यंत दारणा पंपिंग स्टेशनवरील पाणी उचलून सिन्नरकरांना पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे. तसेच नगरपरिषदेकडे असलेल्या पाण्याच्या टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची मागणही जोर धरु लागली आहे.
पाणी जपून वापरण्याचे आवाहन
ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने नगरपरिषदेकडून युद्धपातळीवर त्याचे दुरुस्तीचे काम सुरु आहे. हा ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करण्यासाठी १० ते १५ दिवस लागू शकतात. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात ट्रान्सफॉर्मर उपलब्ध होऊ शकतो का याबाबत नगरपरिषदेकडून प्रयत्न सुरु आहेत. तोपर्यंत नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी केले आहे.
शहराला नियमित २४ तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देऊन आठ वर्षांचा कालावधी लोटला आहे. २४ तास सोडा पाच ते सहा दिवसांनी ऐन दिवाळीत शहराला पाणीपुरवठा होत आहे. सिन्नरकरांना चोवीस तास नको तर दिवसातून किमान अर्धा तास रोज तरी पाणीपुरवठा करावा.
नामदेव कोतवाल, सामाजिक कार्यकर्ते





