अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
विरोधकांना निवडणुकीत यश मिळाले नाही, त्याचे खापर आता ‘एसआयआर’वर फोडले जात आहे. या विषयावरून सुरू असलेली आंदोलने म्हणजे केवळ नौटंकी आहे. या लोकांना देशाचे कायदे आणि घटना मान्य नाहीत. देशात अराजक माजवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे, असा घणाघाती आरोप पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी बुधवारी (7 ऑक्टोबर) केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपच्या वतीने आयोजित सेवा ज्योती यात्रा आणि विकसित भारत संकल्प सभेसाठी पालकमंत्री विखे उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘एसआयआर’च्या मुद्द्यावरून विरोधकांकडून सुरू असलेल्या आंदोलनावर टीका करताना मंत्री विखे म्हणाले, निवडणुकीत यश मिळाले नाही, त्याचे खापर आता ‘एसआयआर’वर फोडले जात आहे. राहुल गांधी यांच्या पक्षाला जनाधार राहिलेला नाही. जनतेने त्यांना नाकारले आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेही या विषयावर विरोधकांना फटकारले आहे. त्यामुळे विरोधकांची सर्वत्र नौटंकी सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भूमिकेवरही विखे यांनी निशाणा साधला. देशातील राजकीय मुद्दे परदेशात मांडून देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
विरोधकांच्या आंदोलनामागे देशात अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विषयावरून विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाबाबतही विखे यांनी विरोधकांवर टीका केली. विरोधकांना आता कोणतेही काम राहिलेले नाही. त्यामुळे आपल्या अस्तित्वासाठी त्यांची धडपड सुरू आहे, असा टोला त्यांनी लगावला. मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील आहेत. आयोगाचे सचिवही बदलण्यात आले आहेत. मात्र, विरोधक या प्रश्नाचे राजकारण करत आहेत. विद्यार्थ्यांनी विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन मंत्री विखे यांनी केले.
सहकारात राजकारणाचे जोडे बाजूला ठेवावेत
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राधाकृष्ण विखे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात प्रथमच एकत्र आल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता मंत्री विखे यांनी त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, सहकाराच्या क्षेत्रात राजकारणातील जोडे बाजूला ठेवून वाटचाल करण्याची प्रथा आहे. तुम्ही या घटनेकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहता, हे महत्त्वाचे आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत काही जागा बिनविरोध होत आहेत, तर काही ठिकाणी निवडणुका होत आहेत. मात्र, हा सहकाराचा विषय असून त्यामध्ये राजकारण केले जाऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
साईबाबांच्या आशीर्वादाने जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध होईल : डॉ. विखे
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काही जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित जागाही बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, साईबाबांच्या आशीर्वादाने इतर जागादेखील बिनविरोध होतील, असा विश्वास माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी यावेळी व्यक्त केला. निवडणूक प्रक्रियेत छाननीच्या वेळी अर्जांवर काही आक्षेप घेतले गेले. त्यामध्ये खोट्या सह्यांचे प्रकार होत असल्यास ते अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर राज्यातील सर्व मोठ्या नेत्यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन केले होते. मात्र, त्यानंतरही या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर राजकारण होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, एसआयआर प्रक्रिया आणि दुष्काळग्रस्त शेतकर्यांना तातडीने न्याय मिळावा, या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली मोर्चावरही डॉ. विखे यांनी टीका केली. शेतकर्यांच्या बांधावर जाण्याऐवजी अशा फालतू मोर्चांमध्ये लोक इकडे-तिकडे फिरत आहेत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, अशा शब्दांत विखे यांनी मोर्चावर निशाणा साधला.




