Tuesday, July 16, 2024
Homeनगर...तर सिताराम गायकर यांना पुन्हा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची लॉटरी

…तर सिताराम गायकर यांना पुन्हा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची लॉटरी

इंदोरी-| Indori

- Advertisement -

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा बँकेचे विद्यमान ज्येष्ठ संचालक सिताराम पाटील गायकर हे पुन्हा जिल्हा बँकेचे अध्यक्ष होण्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. सिताराम पाटील गायकर हे जिल्हा बँकेचे सन 1997 पासून संचालक आहेत. गायकर पाटलांच्या रूपाने जिल्हा बँकेचे अध्यक्षपद पुन्हा अकोले तालुक्याला मिळणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

अहमदनगर जिल्हा सहकारी बँक ही आशिया खंडातील दोन नंबरची बँक म्हणून ओळखली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून या बँकेचे नेतृत्व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात हे करतात. अहमदनगर जिल्हा हा तसा कारखानदारांचा, बड्या राजकीय लोकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र सन 2015 रोजी अहमदनगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा अकोले तालुक्यातील मोग्रस गावचे भूमिपुत्र सिताराम पाटील गायकर यांच्याकडे अजित पवार व बाळासाहेब थोरात यांनी दिली.

सिताराम पाटील गायकर यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कालखंडात अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले. तर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांची कर्ज प्रकरणे मंजूर करून त्यांना मदत केली. तसेच शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेऊन शेतकर्‍यांना 3 लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्याचा धाडसी निर्णयही गायकर पाटील यांनी घेतला. सिताराम पाटील गायकर हे सलग सहा वर्षे जिल्हा बँकेचे अध्यक्ष राहिले.त्यानंतर सन 2021 साली झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ते पुन्हा बिनविरोध निवडून गेले.

यावेळी मात्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उदय शेळके यांना अध्यक्षपदाची संधी दिली. तर काँग्रेसच्या वतीने आ. बाळासाहेब थोरात यांचे समर्थक माधवराव कानवडे यांना उपाध्यक्ष पदाची संधी मिळाली. मात्र जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष उदय शेळके हे गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थतेमुळे बँकेचा कारभार पाहू शकले नाही. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत सध्या बँकेचा कारभार हे उपाध्यक्ष माधवराव कानवडे हे पाहत आहेत. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात जिल्हा बँकेच्या नूतन अध्यक्ष बदलाबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. या चर्चांमध्ये सिताराम पाटील गायकर हे पुन्हा जिल्हा बँकेचे अध्यक्ष होतील, अशीही चर्चा जोर धरू लागली आहे.

जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक मंडळात सिताराम पाटील गायकर यांच्या इतका अनुभवी एकही संचालक नाही. याशिवाय सलग पाच वेळा जिल्हा बँकेत निवडून येणारे गायकर हे अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव संचालक आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा व ज्येष्ठतेचा अहमदनगर जिल्हा बँकेला फायदा होऊ शकतो. त्यामुळे ना. अजित पवार व आ. बाळासाहेब थोरात हे सिताराम पाटील गायकर यांना पुन्हा अध्यक्षपदाची संधी देतील, अशी चर्चा गायकर पाटील यांच्या समर्थकांसह जिल्ह्यात सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या