परभणी | Parbhani
परभणी जिल्ह्यातील (Parbhani District) मानवत तालुक्यातील (Manwat Taluka) यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिराचा (Hanuman Temple) सभामंडप अचानक कोसळल्याची दुर्दैवी घटना आज (शनिवार) दुपारच्या सुमारास घडली. या भीषण दुर्घटनेत मंदिराच्या छताखाली दबल्याने सहा भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास ३० ते ४० भाविक अद्यापही ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
परभणीतील यशवाडी येथील हनुमान मंदिर हे अत्यंत जागृत आणि प्रसिद्ध देवस्थान मानले जाते. केवळ परभणीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. आज शनिवारचा दिवस असल्याने मंदिरात दर्शनासाठी (Darshan) नेहमीप्रमाणे मोठी गर्दी झाली होती. येथील मंदिराच्या सभामंडपाचे काम सध्या प्रगतीपथावर असून, दुपारच्या सुमारास अचानक हा नव्याने बांधण्यात येत असलेला सभामंडप पत्त्यांसारखा कोसळला. मंडप कोसळल्याचा प्रचंड आवाज होताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांची पळापळ सुरू झाली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस अधिकारी आणि स्थानिक यंत्रणांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. यानंतर ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना (People) सुरक्षित बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या मदतीने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. तर जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल झाल्या असून, विशेष वैद्यकीय पथकेही तैनात करण्यात आली आहेत.तसेच ढिगाऱ्याखाली दबलेल्यांना काढण्याचे काम सुरु असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परभणी जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.




