संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील करूले गावात कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या तब्बल 24 गोवंश जनावरांची संगमनेर तालुका पोलिसांनी सुटका केली आहे. या कारवाईत एक टेम्पो जप्त करण्यात आला असून एकूण 46 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई काल मध्यरात्री साडेबारा वाजल्यानंतर करण्यात आली.
याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश दगडू कदम (वय 38, रा. करूले) आणि शमशोद्दीन मशोउद्दीन सय्यद (वय 34, रा. जामगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी कत्तल करण्याच्या उद्देशाने 24 गोवंश जनावरे गणेश कदम याच्या घरासमोर चारा-पाणी न देता बांधून ठेवली होती. याबाबतची माहिती गुप्त खबर्यामार्फत तालुका पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर तालुका पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यादरम्यान पोलिसांनी सर्व 24 गोवंश जनावरांची सुखरूप सुटका केली. या जनावरांची तातडीने पांजरापोळमध्ये रवानगी करण्यात आली. कारवाईत पोलिसांनी सुमारे 6 लाख रुपये किंमतीची 24 गोवंश जनावरे तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात येणारा टेम्पो असा एकूण सुमारे 46 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात वरील दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल एस. के. उगले करीत आहेत. दरम्यान, शहर व तालुका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बेकायदेशीर कत्तलखाने किंवा कत्तलीच्या उद्देशाने जनावरे आढळून आल्यास अशा प्रकारांवर वेळीच कठोर कारवाई करणे अत्यावश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.




