संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
संगमनेर तालुक्यातील कुरण येथून कत्तलीसाठी गोवंश जनावरे कर्नाटक राज्यात नेत असलेल्या तस्करांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत गोवंश तस्करीचा गंभीर प्रकार उघडकीस आणला आहे. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी शिवारातील जावळेवस्ती येथे बुधवारी (ता.31) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या पथकाने एका कंटेनरला अडवून त्यातून 28 गोवंश जातीचे बैल जप्त केले आहेत. या कारवाईत एकूण 32 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
संगमनेर तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुरण परिसरातून कंटेनरद्वारे 28 बैल कत्तलीसाठी कर्नाटक राज्यात नेले जाणार असल्याची गोपनीय माहिती गुप्त खबर्यामार्फत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश देत पथक तयार केले. पोलीस नाईक बापूसाहेब हांडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे व सुनील ढाकणे यांनी बुधवारी पहाटे जावळेवस्ती येथे संशयित कंटेनर अडवला. कंटेनरची तपासणी केली असता आतमध्ये अत्यंत दाटीवाटीने कोंबलेले गोवंश जातीचे मोठे 28 बैल आढळून आले. ही सर्व जनावरे कत्तलीच्या उद्देशाने कर्नाटक राज्यात नेली जात असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात 12 लाख 60 हजार रुपये किमतीचे 28 बैल व 20 लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण 32 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सय्यद रिजवान दस्तगिर (रा. नरसिंम्हा नायकानगर, होले नरसिपूर, जिल्हा हसन, राज्य कर्नाटक) याच्याविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेले सर्व 28 गोवंश बैल सुरक्षितपणे सायखिंडी येथील गोशाळेत नेऊन सोडले आहेत. या कारवाईमुळे बैलांचे प्राण वाचले असून पशुसंवर्धन व गोसंरक्षणाच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.
विशेष म्हणजे, गोवंश जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करताना पहिल्यांदाच कंटेनरचा वापर झाल्याचे या कारवाईतून समोर आले आहे. यापूर्वी ट्रक किंवा इतर वाहनांचा वापर होत असताना आता कंटेनरद्वारे तस्करी केली जात असल्याने गोवंश तस्करांच्या पद्धती बदलत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे संगमनेर तालुक्यासह परिसरात खळबळ उडाली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार बी. वाय. टोपले हे करत आहेत.





