Sunday, February 8, 2026
HomeराजकीयZP Election: मतदान संपलं अन् EVM मशीन चक्क ढाब्यावर आढळल्या, नेमकं काय...

ZP Election: मतदान संपलं अन् EVM मशीन चक्क ढाब्यावर आढळल्या, नेमकं काय घडलं?

सोलापूर । Solapur

राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी शनिवारी उत्साहात मतदान पार पडले. सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदारांनी आपला हक्क बजावला.

- Advertisement -

मात्र, मतदानाची प्रक्रिया पूर्ण होताच आणि निकालाची प्रतीक्षा सुरू असतानाच, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोहोळ शहराजवळील एका खाजगी हॉटेल आणि बारच्या परिसरात थेट ईव्हीएम (EVM) मशीन्स आढळून आल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

YouTube video player

मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ मतदारसंघातील राजकारण मध्यरात्री या घटनेमुळे अक्षरशः तापले. मोहोळ शहराजवळील ‘स्वराज्य बार अँड हॉटेल’ परिसरात काही संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उमेश पाटील यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह तातडीने हॉटेल गाठले. तिथे पोहोचल्यानंतर काही व्यक्तींच्या ताब्यात चक्क ईव्हीएम मशीन्स असल्याचे त्यांना दिसून आले.

उमेश पाटील यांनी तत्काळ या प्रकाराचा जाब विचारण्यास सुरुवात केली आणि हा सर्व धक्कादायक प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. एका सार्वजनिक निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या मशीन्स अशा प्रकारे खाजगी हॉटेल किंवा बारच्या परिसरात कशा असू शकतात, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. या घटनेमुळे निवडणूक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि एकूणच पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर आणि तहसीलदार सचिन मुळीक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाकडून या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना सांगण्यात आले की, या मशीन्स प्रत्यक्ष मतदानासाठी वापरलेल्या नसून त्या ‘राखीव’ (Reserve) स्वरूपातील होत्या. तांत्रिक बिघाड झाल्यास पर्याय म्हणून या मशीन्स ठेवल्या जातात, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

मात्र, प्रशासनाच्या या स्पष्टीकरणानंतरही वादावर पडदा पडलेला नाही. राखीव मशीन्सची ने-आण करताना जी कडक सुरक्षा व्यवस्था आणि प्रोटोकॉल असणे आवश्यक असते, त्याचे पालन या ठिकाणी झाले होते का? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खाजगी हॉटेलमध्ये या मशीन्स असणे हे नियमांचे उल्लंघन असल्याचे बोलले जात आहे.

उमेश पाटील यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून, मतदानाच्या प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकारामुळे मतदारांमध्येही गोंधळाचे वातावरण असून, आता निवडणूक आयोग यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या हायहोल्टेज ड्रामानंतर सोलापूरमधील राजकीय वातावरण अधिकच संवेदनशील झाले आहे.

ताज्या बातम्या

Chhagan Bhujbal: ‘त्या’ घटनेवरून मंत्री भुजबळ आक्रमक; थेट केंद्रीय गृहमंत्री अमित...

0
नाशिक | Nashik तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात (Sangareddy District) काही समाजकंटकांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी...