Friday, May 3, 2024
Homeनगरमनपाच्या सहा सौरऊर्जा प्रकल्पाचे काम रखडले

मनपाच्या सहा सौरऊर्जा प्रकल्पाचे काम रखडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अमृत अभियानाअंतर्गत महानगरपालिकेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम महाऊर्जामार्फत सुरू आहे. मात्र, कामाची मुदत संपून अडीच वर्षे लोटली, तरी केवळ दोनच ठिकाणी प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. महापौर रोहिणी शेंडगे यांनी ठेका रद्द करून नवीन संस्थेला काम देण्याचे आदेश दिले होते. आता नगर विकास विभागाकडूनही काम रखडल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या संदर्भात आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी महाऊर्जाच्या महासंचालकांना पत्र दिले आहे.

- Advertisement -

1.6 मेगावॅट क्षमतेच्या सौर उर्जा निर्मिती प्रकल्पाचे काम महाऊर्जामार्फत खासगी संस्थेला देण्यात आले होते. त्याच्या कामापोटी पाच कोटी 91 लाख 31 हजार 973 रूपये महाऊर्जाकडे हस्तांतरीत करण्यात आलेले आहेत. 31 मे 2020 रोजी मुदत संपुष्टात आली आहे. त्यानंतर 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, या कालावधीत एजन्सीमार्फत कुठलीही कार्यवाही न झाल्याने पुन्हा 31 जानेवारी 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तरीही एजन्सीने काम सुरू केलेले नव्हते.

मागील वर्षी काम सुरू करण्यात आले. सद्यस्थितीत विळद व नागापूर येथे प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. मात्र, इतर सहा ठिकाणी प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही. वेळोवेळी मुदतवाढ देवूनही ठेकेदाराने काम पूर्ण केले नसल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी ठेकेदारास आदेश द्यावेत व नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी, असे आयुक्तांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या