बारामती । Baramati
बारामती तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि सहकार क्षेत्राच्या राजकारणातील केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या ‘श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या’ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (NCP) अंतर्गत बंडखोरीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीतून बंडाचे निशाण उभारलेले नेते पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपच्या पाठिंब्याने ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल’ निवडणूक रिंगणात उतरवल्याने ही लढत अत्यंत रंगतदार व चुरशीची ठरत आहे.
या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, “अजितदादांचे नाव व फोटो न वापरता स्वतःच्या जीवावर निवडणूक लढवून दाखवा,” असे थेट आव्हान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बंडखोरांना दिले होते. या आव्हानाला पुरुषोत्तम जगताप यांनी अत्यंत आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले आहे. माध्यमांशी बोलताना जगताप म्हणाले, “कारखान्याच्या विकासाच्या आणि सभासदांच्या हिताच्या मुद्द्यावरूनच आम्ही बाहेर पडलो आहोत. अजितदादांची गणना महापुरुषांमध्ये केली जाते. त्यामुळे मी अजित पवारांचे नाव वापरणारच. सुनेत्राताई अजितदादांना सभासदांच्या मनातून आणि हृदयातून कसे बाहेर काढणार?”
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस बारामती तालुकाध्यक्षांनी अजितदादांच्या नावाचा वा फोटोचा वापर करण्यासाठी कुटुंबीयांची परवानगी घेण्याचे पत्र प्रसिद्ध केल्यानंतर, जगताप यांनी वानेवाडी येथील प्रचार मेळाव्यातून पवारांचा फ्लेक्स हटवला. मात्र, “फोटो लावला किंवा नाही लावला, दादा सभासदांच्या मनातच आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम टप्प्यानंतर सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीचे अंतिम चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे:
- एकूण दाखल अर्ज: ६०१
- छाननीत पात्र ठरलेले अर्ज: ५१४
- माघार घेतलेले उमेदवार: ४३१
- प्रत्यक्ष निवडणूक रिंगणातील उमेदवार: ८३
तब्बल ४३१ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता २१ जागांसाठी ८३ उमेदवारांमध्ये प्रत्यक्ष सामना रंगणार आहे. यंदाच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे अधिकृत पॅनेल, युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पॅनेल आणि भाजपच्या पाठिंब्याने पुरुषोत्तम जगताप यांचे बंडखोर पॅनेल अशा तीन प्रमुख आघाड्या रिंगणात उतरल्या आहेत. या तिहेरी लढतीमुळे सोमेश्वर कारखान्याची सत्ता कोणाच्या हाती जाते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.




