Friday, May 3, 2024
Homeनगरप्रा. सोमनाथ निबे यांचा विहिरीत बुडून मृत्यू

प्रा. सोमनाथ निबे यांचा विहिरीत बुडून मृत्यू

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

कोल्हार बुद्रुक येथील प्राध्यापक सोमनाथ संतराम निबे (वय 53) यांचा शुक्रवारी सायंकाळी शेताजवळील विहिरीमध्ये पाण्यात बुडून मृत्यू झाला.

- Advertisement -

पोलिसांना विहिरीजवळ पॅनल बॉक्समध्ये लिहून ठेवलेली एक चिट्ठी सापडल्याने प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे दिसून येते. यासंदर्भात लोणी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

प्रा. सोमनाथ निबे लोणी येथील प. विखे पा. कनिष्ठ महाविद्यालयात जीवशास्त्र विभागाचे प्रमुख होते. सध्या ते लोणी येथे वास्तव्यास होते. शुक्रवारी सायंकाळी ते लोणीहून मोटरसायकलवर आपल्या कोल्हार येथील शेतात आले. मोटारसायकल शेतातील विहिरीजवळच उभी केली. सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.

शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत ही बाब कुणाच्याही लक्षात आली नाही. मात्र काल सकाळी स्थानिकांनी विहिरीत डोकावून पाहिले असता प्रा. निबे यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. घटनेची खबर मिळताच लोणी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब सूर्यवंशी, सहाय्यक फौजदार बाबासाहेब लबडे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.

मृतदेह विहिरीतून बाहेर काढून लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. काल दुपारी मयत सोमनाथ निबे यांच्यावर कोल्हार भगवतीपूर येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रा. सोमनाथ निबे यांच्या पश्चात आई, पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी, 2 बहिणी असा परिवार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या