मुंबई । Mumbai
प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि पद्मश्री पुरस्कार विजेते सोनम वांगचुक गेल्या १६ दिवसांपासुन उपोषणावर बसले आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या या उपोषणावरून आता देशातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. ‘सरकारला सोनम वांगचुक यांचा जीव घ्यायचा आहे का?’ असा थेट सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. वांगचुक यांच्यासारख्या महान पर्यावरणवाद्याच्या उपोषणाकडे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. राऊत म्हणाले, “सोनम वांगचुक हे केवळ स्वतःसाठी नाही, तर आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी आणि पर्यावरणासाठी लढत आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, १६ दिवस उलटूनही सरकारने अद्याप कोणतीही सकारात्मक पावले उचललेली नाहीत किंवा त्यांच्याशी कोणताही संवाद साधलेला नाही.”
राऊत म्हणाले की, जेव्हा अण्णा हजारे उपोषणाला बसले होते, तेव्हा तत्कालीन केंद्र सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांनी आणि प्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली होती, त्यांचा दृष्टिकोन समजून घेतला होता. लोकशाहीत संवादाला महत्त्वाचे स्थान असते, मात्र सद्यस्थितीत सरकारकडून कोणतीही संवादाची तयारी दिसत नाही. राऊत यांनी पुढे अण्णा हजारे यांना आवाहन केले की, त्यांनीही सोनम वांगचुक यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे आणि त्यांची भेट घेतली पाहिजे.
संजय राऊत यांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी स्पष्ट करताना थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या ‘नीट’ (NEET) सारख्या राष्ट्रीय स्तरावरी परीक्षांमधील मोठ्या प्रमाणावरील घोटाळ्यांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले असून, अनेक नैराश्यातून विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. या सर्व शैक्षणिक आणि प्रशासकीय अनागोंदीविरोधात वांगचुक आवाज उठवत असल्याचे राऊत यांनी नमूद केले.
दुसरीकडे, या आंदोलनाची धग आता थेट देशाच्या राजधानीत पोहोचणार आहे. येत्या २० जुलै रोजी अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली संसदेवर एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मोर्चाला आपला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे म्हणाले, “सोनम वांगचुक गेल्या १५ दिवसांपेक्षा जास्त काळ उपोषण करत असून त्यांचे वजन तब्बल ८ किलोपेक्षा जास्त घटले आहे. त्यांची प्रकृती खालावत चालली तरी सरकार याकडे लक्ष देत नाही. मी स्वतः त्यांच्याशी फोनवर संवाद साधून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे, कारण देशाला त्यांच्यासारख्या विचारवंताची आणि देशभक्ताची खूप गरज आहे.” या आंदोलनाला बळ देण्यासाठी वेळ मिळाल्यास आपण स्वतः दिल्लीतील जंतर-मंतर येथे जाऊन आंदोलनात सहभागी होण्याचा प्रयत्न करू, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.




