श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrirampur
कृषी विभागामार्फत यंदाच्या रब्बी हंगामासाठी शेतकर्यांना ज्वारी बियाणे मोफत वाटण्यात आले. परभणी विद्यापीठाने संशोधित केलेल्या परभणी शक्ती या वाणाचे बियाणे महाबीजमार्फत कृषी विभागाच्या माध्यमातून तालुक्यातील 1500 शेतकर्यांना वाटले गेले. मात्र ऑक्टोबर महिन्यात पेरणी झालेल्या ज्वारीची डिसेंबर अखेरपर्यंत अवघी दोन ते अडीच फूट वाढ झाल्याने अनेक शेतकर्यांनी कृषी विभागाकडे धाव घेत अधिकार्यांना याबाबत जाब विचारला आहे.
कृषी विभागामार्फत समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने संतप्त शेतकर्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. कृषी विभागाने महाबीज बियाणे महामंडळाचे अधिकारी तसेच परभणी कृषी विद्यापीठातील तज्ञांना संपर्क करत तातडीने पाहणी केली. यामध्ये ज्वारी संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ज्वारी पैदासकार शास्त्रज्ञ डॉ. अंबिका मोरे, जालना येथील विभागीय व्यवस्थापक राजाभाऊ मोराळे, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक दौंड, कृषी अधिकारी रवींद्र काळभोर, तालुका कृषी अधिकारी चौधरी यांनी कापसे तसेच भोळे वस्ती येथील अनेक शेतकर्यांच्या प्लॉटला प्रत्यक्ष भेट दिली.
डॉ. अंबिका मोरे यांनी स्पष्ट सांगितले की, परभणी शक्ती हा वाण कमी वाढणारा असून त्यामध्ये लोह आणि जस्ताचे प्रमाण अधिक असल्याने शासनाच्या पोषण सुधार योजनेअंतर्गत याचे संपूर्ण राज्यात वाटप करण्यात आली आहे. कमी वाढणार्या या वाणाची माहिती महाबीजने कृषी विभागाला आणि कृषी विभागाने शेतकर्यांना देणे गरजेचे असताना प्रत्यक्षात असे झाले नाही व यामुळे तालुक्यातील दीड हजार, जिल्ह्यातील 20 ते 22 हजार आणि राज्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावर शेतकर्यांनी हे बियाणे पेरले आणि यामुळे हजारो शेतकरी संकटात सापडले. ज्वारीचे पीक हे ज्वारी आणि कडबा अशा दुहेरी हेतूने केले जाते मात्र अवघ्या 2 फूट वाढलेल्या या ज्वारीमुळे राज्यात जनावरांच्या चार्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.
राज्य शासनाने कृषी विभागाच्या माध्यमातून प्रकल्प राबवायला सांगितला, कृषी विभागाने तो राबवला पण यामध्ये शेतकरी भरडला गेला. त्यामुळे यात दोषी असणार्यांवर कारवाई व्हावी व शेतकर्यांच्या पिकांचे पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी अरविंद कापसे यांनी केली आहे.




