दिल्ली । Delhi
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिल्याच सामन्यात विजयी सलामी देत भारतीय क्रिकेट संघानं धडाकेबाज सुरुवात केली आणि क्रिकेटप्रेमींचा आनंद द्विगुणित झाला.
पण, या आनंदाला गालबोट लागलं ते एका चिंता वाढवणाऱ्या बातमीनं. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि BCCI चा माजी अध्यक्ष सौरव गांगुली याच्या कारला भीषण अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार दंतनपूरजवळ गांगुलीच्या ताफ्यासमोर अचानक एक ट्रक आल्यामुळे, गांगुलीच्या कार चालकाला ब्रेक लावावे लागले आणि यामुळे मागून येणारी अनेक वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातानंतर सौरव गांगुली १० मिनिटे घटनास्थळी उपस्थित होता, त्यानंतर तो कार्यक्रमासाठी निघून गेला, असे वृत्त आहे.
सुदैवाने, वेळेवर ब्रेक लावल्याने कोणीही जखमी झाले नाही आणि मोठा अपघात टळला. या अपघाताबाबत सौरव गांगुलीने स्वतः किंवा त्याच्या व्यवस्थापकांनी कोणतेही विधान अद्याप जारी केलेले नाही. परंतु गांगुलीला या अपघातात कोणतही इजा झालेली नाही.