Thursday, May 2, 2024
Homeशैक्षणिकनवीकृत ऊर्जा, रोजगाराचा स्त्रोत

नवीकृत ऊर्जा, रोजगाराचा स्त्रोत

नवीकृत ऊर्जेचे क्षेत्र हा ऊर्जेप्रमाणेच रोजगाराचा मोठा स्रोत आहे. पारंपरिक ऊर्जेची जागा नवीकृत ऊर्जेची विविध क्षेत्रे काबीज करीत आहेत. कुठे सौरऊर्जा, कुठे पवनऊर्जा, कुठे बायोगॅस तर कुठे जलविद्युत निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. पारंपरिक ऊर्जेला नवनवे पर्याय जगभरात शोधले जात आहेत. अर्थातच या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित तंत्रज्ञांची गरज आगामी काळात वाढत जाणार आहे. ठिकठिकाणी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार केले जात आहे. या क्षेत्रांत बी. टेक, एम. टेक पदव्या तसेच ऊर्जानिर्मिती विषयातील पदविका अभ्यासक्रम वाढत आहेत. हे क्षेत्र आव्हानात्मक तसेच युवकांना आकर्षित करणारे आहे.

सौरऊर्जा : नवीकृत ऊर्जेच्या क्षेत्रात सर्वाधिक काम सध्या सौरऊर्जेवर सुरू आहे. आपल्या देशात सोलर मिशन अंतर्गत येत्या पाच वर्षांत एक लाख मेगावॉट वीजनिर्मिती सौरऊर्जा संयंत्रांद्वारे करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या क्षेत्रात सोलर सेल आणि सोलर थर्मल अशा दोन विभागांत काम केले जाते. सौरऊर्जेचे अन्य ऊर्जेत रूपांतर करून ती वापरली जाते. ही पद्धती थोडी खर्चिक आहे. काही ठिकाणी सूर्याच्या किरणांद्वारे बॅटरी चार्ज केली जाते तर काही ठिकाणी सौरऊर्जेवर पाण्याची वाङ्ग बनवून तिचा उपयोग ऊर्जानिर्मितीसाठी केला जातो. स्नानासाठी पाणी गरम करणे किंवा सौरऊर्जेद्वारे वाङ्ग बनवून भात शिजविणे ही या प्रकाराची उदाहरणे होत. आपल्या देशातील अनेक संस्थांमध्ये सूर्यकिरणांच्या साह्याने वीजनिर्मिती करून ती वापरली जाते. जर आकाशात ढग असतील आणि सूर्यकिरण उपलब्ध होत नसतील तर अन्य मार्गांनी मिळणारी वीज वापरली जाते. या क्षेत्रात भविष्यात मोठे काम होणार आहे.

- Advertisement -

पवनऊर्जा : पवनऊर्जा हा अपारंपरिक ऊर्जेचा दुसरा महत्त्वाचा मार्ग आहे. जिथे सोसाट्याचे वारे वाहतात तेथे वार्‍याच्या मदतीने ऊर्जा बनविली जाते. समुद्रकिनारे, उंच डोंगरशिखरांचा वापर त्यासाठी केला जातो. वाळवंटी प्रदेशांत पवनऊर्जा निर्मिती प्रकल्पांमधून 50 हजार मेगावॉट विजेची निर्मिती सध्या केली जाते. अशी ऊर्जा बनविण्यासाठी अन्य ठिकाणांचाही शोध घेतला जात असून, नवनवीन प्रकल्प उभे राहत आहेत. केंद्र सरकारचे स्वतंत्र मंत्रालय या क्षेत्रात काम करीत आहे.

अन्य ऊर्जास्रोत : बायोगॅस, जलविद्युत, लाटेवर वीजनिर्मिती हे अन्य काही अपारंपरिक ऊर्जास्रोत होत. या क्षेत्रांत देशभरात विविध स्तरांवर काम सुरू आहे. केंद्र सरकारने यासाठी स्वतंत्र केंद्राची स्थापना केली असून, अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाच्या अधिपत्याखाली हे केंद्र कार्यरत आहे. लहान आकाराची जलविद्युत केंद्रेही उभारली जात आहेत. अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा शोध आणि वापर करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक ठिकाणी केंद्रे उभारली आहेत. यात चेन्नईचे सेंटर ङ्गॉर विन्ड एनर्जी, कपूरथळा येथील सरदार स्वर्णसिंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑङ्ग रिन्यूएबल एनर्जी, तसेच आयआयटी रुकडी येथील वैकल्पिक हायड्रो एनर्जी सेंटरचा समावेश आहे.

प्रमुख अभ्यासक्रम

नवीकृत ऊर्जेच्या क्षेत्रात व्यवसायाच्या आणि रोजगाराच्या वाढत्या संधी लक्षात घेऊन अनेक विद्यापीठे आणि शिक्षणसंस्थांनी याविषयीचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून सौरऊर्जेच्या क्षेत्रात राजधानी दिल्लीत वेगळा प्रयत्न केला गेला. युवक, विद्यार्थी, उद्योजक, सेवानिवृत्त आणि नोकरदार अशा सर्वांना एकत्रित आणून असे व्यासपीठ तयार करण्यात आले, ज्यातून रोजगारनिर्मिती होऊ शकेल.

*काही वर्षांपूर्वी जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठाने सौरऊर्जेविषयी काही अभ्यासक्रम सुरू केले. येथे विद्यार्थ्यांना सौरऊर्जेचे तंत्रज्ञान आणि व्यवसाय दोहोंची माहिती दिली जाते. नवीकृत आणि सौरऊर्जेच्या क्षेत्रात प्रमाणपत्र अभ्यासक्रम, पदविका, पदवी, उच्च पदवी आणि पीएच.डी.. करण्याचीही सोय आहे.

भरपूर संधी : ज्या युवकांना काही वेगळे करून दाखविण्याची इच्छा आहे, त्यांना या क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध आहेत. भविष्यातील अनेक शक्यता ओळखून युवकांनी या क्षेत्राकडे वळले पाहिजे. युवकांना या क्षेत्रात पुढील पदांवर काम करता येते.

अभियंता : सौरऊर्जा, जलविद्युत, पवनऊर्जा, बायोगॅस, लाटांद्वारे वीजनिर्मिती अशा अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रांमध्ये अभियंत्यांना मोठी मागणी आहे. ज्यांना मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग क्षेत्राची चांगली माहिती आहे, त्यांना या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळत आहे. अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रातील अनेक कंपन्या अशा अभियंत्यांना सेवेत सामावून घेत आहेत. त्यांना चांगल्या सुविधा आणि उत्तम वेतन मिळत आहे. विविध कार्यालये, संस्थांना सौरऊर्जेची सेवा उपलब्ध करून देणे हे अभियंत्यांचे काम आहे. परिस्थिती लक्षात घेऊन जास्तीत जास्त वीजनिर्मिती होईल असे डिझाइन तयार करणे हे अभियंत्यांचे काम आहे.

डिझाइनर : सौरऊर्जेच्या निर्मितीशी संबंधित अनेक यंत्रांची निर्मिती करण्यासाठी आधी त्याचे डिझाइन तयार करणे गरजेचे आहे. प्रकल्प कसा असेल, नेहमीच्या वापरातील वस्तूंचे डिझाइन कसे असेल, हे निश्‍चित करण्यासाठी सोलर डिझाइनरची गरज भासते. सोलर उपकरणांचे डिझाइन करणारा उत्तम कमाई करू शकतो.

मेकॅनिक : बाजारात मिळणारी सौरऊर्जेवरील उपकरणे आणि सौरऊर्जेचा प्लान्ट नादुरुस्त होऊ शकतो आणि तो दुरुस्त करण्यासाठी मेकॅनिकची गरज भासते. सौरबॅटरी असो वा सौरऊर्जेवरील चूल, अशा असंख्य उपकरणांची दुरुस्ती करणार्‍या तंत्रज्ञांची गरज आगामी काळात मोठ्या प्रमाणावर भासणार आहे.

प्रवेशप्रक्रिया : ज्यांना पदविका अभ्यासक्रम करायचा आहे, त्यांच्यासाठी विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने बारावीपर्यंत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणिताचे शिक्षण घेतलेले असावे, अशी त्यामागील भूमिका आहे. बी. टेक. अभ्यासक्रमासाठी मुख्यत्वे ऑल इंडिया इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश घेता येतो. अनेक संस्थांच्या स्वतःच्या प्रवेश परीक्षा असतात. एम. टेक आणि पीएच. डी.ची प्रवेश प्रक्रियाही परीक्षेच्या माध्यमातूनच होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या