अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
प्रशासकीय बदल्या झाल्यानंतरही काही पोलीस अंमलदारांना त्यांच्या ठिकाणाहून कार्यमुक्त न केल्याच्या गंभीर पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सोमवारी (23 जून) कडक भूमिका घेतली. त्यांनी नव्याने आदेश काढून सर्व संबंधित प्रभारी अधिकार्यांना आजच कार्यमुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश दिला असून, अन्यथा संबंधितांवर शिस्तभंगाची कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
प्रत्येक पोलीस अंमलदाराची 5 वर्षे पूर्ण झाल्यावर प्रशासकीय बदल्या नियमितपणे केल्या जातात. अंमलदारांच्या पसंतीच्या ठिकाणांची नोंद घेऊन पोलीस अधीक्षक बदली दरबार घेऊन बदल्या जाहीर केल्या जातात. मात्र, काही प्रभारी अधिकारी आपल्याच मर्जीतील अंमलदारांना थांबवण्यासाठी त्यांना कार्यमुक्त करत नाहीत. यामुळे जिल्हा पोलीस दलात नाराजी आणि उलटसुलट चर्चा सुरू आहेत. याआधी 29 एप्रिल 2023, 30 जून 2023, 21 जुलै 2024, 29 मे 2025 व 4 जून 2025 रोजी देखील कार्यमुक्तीबाबत आदेश जारी करण्यात आले होते. तरीही अद्याप काही अंमलदार कार्यरतच असून, ते नवीन जागी रूजू झालेले नाहीत. यामुळे पोलीस अधीक्षकांनी सोमवारी पुन्हा आदेश काढून कडक सूचना दिल्या आहेत.
अधीक्षक घार्गे यांनी आदेशात नमूद केले आहे की, सन 2023 पासून विविध कालखंडात प्रशासनिक किंवा विनंतीवरून ज्या पोलीस अंमलदारांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या आहेत, त्यांना अद्याप कार्यमुक्त न करणे हे शासनाच्या नियमांनुसार अयोग्य आहे. त्यामुळे असे अंमलदार आजच (23 जून) कार्यालयीन वेळेनंतर तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावेत व कारवाईचा अहवाल सादर करण्यात यावा. पोलीस अधीक्षकांनी आदेशात स्पष्ट केले आहे की, जर कोणत्याही पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्याने कार्यमुक्ती प्रक्रियेत टाळाटाळ केली, तर त्यांना वैयक्तिकरीत्या जबाबदार धरले जाईल आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल. कार्यमुक्त न होणार्या अंमलदारांमुळे बदल्यांचे उद्दिष्टच कुंठीत होत असून, प्रशासकीय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. त्यामुळे अधीक्षक घार्गे यांनी घेतलेली कडक भूमिका पोलीस खात्यात शिस्त व नियमबध्दता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे.
पोलीस अंमलदार यांना बदली ठिकाणी तात्काळ कार्यमुक्त करण्याबाबत आदेश काढले आहेत. अंमलदारांना कार्यमुक्त न करणार्या प्रभारी अधिकार्यांवर कारवाई केली जाईल. बदली झालेल्या, परंतू कार्यमुक्त न केलेल्या पोलीस अधिकार्यांना देखील दोन ते तीन दिवसांत कार्यमुक्त केले जाईल.
– सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक
अधिकार्यांना कार्यमुक्ती कधी ?
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी संपूर्ण परिक्षेत्रात, तर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यांतर्गत पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्या केल्या आहेत. मात्र, काही अधिकारी अद्यापही त्यांच्या जुन्या पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत आहेत. काहींना तर बदल्या होऊन वर्ष झाले आहे, पण तरीही कार्यमुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांना कधी कार्यमुक्त केले जाणार, असा सवाल पोलीस दलामध्ये उपस्थित केला जात आहे.





