अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
विधान परिषदेचे सभापतीपदी राम शिंदे यांच्या सर्वपक्षीय सत्कार सोहळ्याकडे सत्ताधारी महायुती आणि विशेषत: भाजपच्याच आमदारांनी पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. दरम्यान, भाजपच्या मेळाव्यासंदर्भात शिर्डीत प्रदेश पदाधिकार्यांसमवेत महत्वाची बैठक असल्याने भाजपचे आमदार आणि नेते कार्यक्रमाला हजेरी लावू शकले नाहीत, असे स्पष्टीकरण आयोजकांकडून देण्यात आले.
अहिल्यानगर शहरातील माऊली सभागृहात विधान परिषदेचे नूतन सभापती राम शिंदे यांचा सर्वपक्षीय सत्कार सोहळा शनिवारी पार पडला. या सत्कार सोहळ्याला विधान परिषद सदस्य सत्यजित तांबे व श्रीरामपूर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांच्याशिवाय जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातून दुसर्या व तिसर्या फळीतील नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.या भाजपचे नेते जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे, ज्येष्ठ आमदार शिवाजी कर्डीले, आमदार मोनिका राजळे, विक्रम पाचपुते यांच्यासह महायुतीचे नगर शहरातील आमदार संग्राम जगताप, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, अकोल्याचे आ.डॉ. किरण लहामटे आणि राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आ. रोहित पवार, शिंदे गटाचे आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत होते. मात्र ते कार्यक्रमाला अन्य कार्यक्रमांत व्यस्त असल्याने आले नाहीत. यावरून राजकीय क्षेत्रात मात्र चर्चेला तोंड फुटले.
नगर जिल्ह्याला मोठ्या खंडानंतर राम शिंदे यांना विधान परिषदेचे सभापती पद मिळाले असून यानिमित्ताने जिल्ह्याच्यावतीने सर्वपक्षीय सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र स्वपक्ष आणि मित्रपक्षांच्या आमदारांनी या कार्यक्रमाला दांडी मारल्याने याविषयी चर्चा रंगली. यावेळी सभापती राम शिंदे यांनी देखील अप्रत्यक्षपणे आपल्या भाषणात जिल्ह्यात होणार्या राजकीय त्रासावर भाष्य केले.