नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. देशातील विविध भागातून त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करण्यासाठी भाविक प्रयागराज येथे येत आहेत. दरम्यान, झाशीहून प्रयागराज येथे जात असलेल्या ट्रेनवर हरपालपूर स्टेशनवर जमावाकडून हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. अचानक झालेल्या तोडफोडीमुळे रेल्वेतील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
झाशीहून प्रयागराजला जाणाऱ्या क्र. ११८०१ या ट्रेनवर दगडफेक झाल्याची माहिती मिळत आहे. हरपालपूर रेल्वे स्थानकावर प्रयागराजला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. मात्र विशेष ट्रेनच्या आत उपस्थित असलेल्या प्रवाशांनी दरवाजे उघडले नाहीत. यामुळे स्थानकावर उपस्थित असलेल्या प्रवाशांनी नाराजी व्यक्त करत दगडफेक करत तोडफोड सुरू केली. उद्या मौनी अमावस्या आहे. त्यामुळे प्रयागराजमध्ये रेकॉर्डब्रेक गर्दी होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. लाखोंच्या संख्येने भाविक प्रयागराजध्ये स्नानासाठी पोहोचतील असे सांगण्यात येत आहे.
हल्ल्याशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये जमावामधील अनेक लोक ट्रेनच्या डब्यावर दगडफेक करताना दिसत आहेत. हा जमाव ट्रेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता. मात्र आतमध्ये प्रवेश करता न आल्याने या जमावाने डब्याचे दरवाजे आणि खिडक्या तोडल्या.
रेल्वेवर अशा प्रकारे झालेल्या हल्ल्यामुळे रेल्वे सुरक्षेच्या मुद्यावरून टीका केली जात आहे. महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या सरकारने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. कुंभ नगरी प्रयागराजमध्ये ठिक-ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. सोबतच प्रशासकीय अधिकारीही परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा