दिल्ली । Delhi
देशात गेल्या काही दिवसांपासून विमान अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाला झालेल्या भीषण अपघातानंतर आता आणखी एक थरारक घटना समोर आली आहे.
दिल्लीहून लेहच्या दिशेने झेप घेतलेल्या स्पाइसजेटच्या विमानात तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याची चिन्हे दिसताच, पायलटने प्रसंगावधान राखून विमानाचे दिल्ली विमानतळावर सुरक्षित आपत्कालीन लँडिंग केले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती, मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्पाइसजेटचे ‘SG 121’ हे विमान आपल्या नियोजित वेळेनुसार दिल्लीहून लेहसाठी रवाना झाले होते. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच वैमानिकाला विमानातून आगीच्या ठिणग्या बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले. विमानात काहीतरी गंभीर बिघाड झाल्याचे लक्षात येताच, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून पायलटने लेहला जाण्याऐवजी पुन्हा दिल्लीकडे परतण्याचा निर्णय घेतला. अवघ्या काही मिनिटांतच विमान पुन्हा धावपट्टीवर उतरल्याने विमानतळ परिसरात मोठी खळबळ उडाली.
विमानातून आगीच्या ठिणग्या पडताना पाहून विमानातील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक प्रवासी घाबरून ओरडू लागले. दरम्यान, एका प्रवाशाने या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला असून, त्यामध्ये विमानातून आगीच्या ठिणग्या स्पष्टपणे बाहेर पडताना दिसत आहेत. या गंभीर प्रसंगानंतर विमानातील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना धीर देत शांत राहण्याचे आवाहन केले.
दिल्ली विमानतळावर विमानाचे सुरक्षित लँडिंग झाल्यानंतर तातडीने सर्व प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि सर्व प्रवासी सध्या सुरक्षित आहेत. तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. विमानतळ प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून विमानाची कसून तपासणी सुरू केली असून, प्रवाशांच्या पुढील प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे.
अजित पवार यांच्याशी संबंधित विमान अपघाताची चर्चा आणि रांची-दिल्ली विमान अपघातात झालेल्या सात जणांच्या मृत्यूनंतर ही तिसरी मोठी घटना समोर आल्याने विमान प्रवासाच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे हवाई वाहतूक क्षेत्रात चिंतेचे वातावरण असून, विमान कंपन्यांनी तांत्रिक तपासणीकडे अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.





