मुंबई | Mumbai
भारत आणि वेस्ट इंडिज (India and West Indies) संघांदरम्यान खेळल्या जात असलेल्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना आज (शनिवारी) बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी मैदानावर (Ground) रंगणार आहे. मालिकेची सद्यस्थिती पाहता दोन्ही संघ २-२ अशा बरोबरीत असल्याने क्रिकेट चाहत्यांचे संपूर्ण लक्ष या अंतिम लढतीकडे लागले आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचे सावट निर्माण झाले आहे.
मुसळधार पावसाची शक्यता
हवामान खात्याच्या अंदाजानुसार सामन्याच्या दिवशी बंगळुरूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार सायंकाळी ५ वाजता ६६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून, नाणेफेकीच्या वेळी (सायंकाळी ६:३० ते ७ दरम्यान) ६८ टक्के पावसाची शक्यता आहे. तर रात्री ८ ते १० दरम्यान ६९ ते ७० टक्के पावसाची कोसळण्याचा अंदाज आहे. या पावसामुळे सामन्याच्या नाणेफेकीला विलंब होऊ शकतो तसेच षटकांची संख्या कमी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे देखील वाचा : IND vs NZ : न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय अन् कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; शुभमन गिलकडे ODI ची धुरा, नवीन चेहऱ्यांनाही संधी
सामना रद्द झाल्यास संयुक्त विजेतेपद
जर पावसामुळे (Rain) एकही चेंडू न टाकता सामना रद्द करावा लागला, तर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ही टी-२० मालिका २-२ अशा बरोबरीत सुटेल. नियमानुसार, अशा परिस्थितीत दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल. त्यामुळे हवामान कशी साथ देते आणि चाहत्यांना पूर्ण सामना पाहायला मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारताची संभाव्य प्लेइंग ११
संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, अक्षर पटेल, नितीश रेड्डी, नमन धीर, कुलदीप यादव, प्रिन्स यादव आणि अर्शदीप सिंग.




