Saturday, November 21, 2026
Homeब्रेकिंग न्यूजIND vs NZ 1st Test : वेलिंग्टन कसोटीत भारत मजबूत स्थितीत; तिसऱ्या...

IND vs NZ 1st Test : वेलिंग्टन कसोटीत भारत मजबूत स्थितीत; तिसऱ्या दिवसअखेर ४ बाद ४८६ धावा

के.एल. राहुलचे शतक तर गिलचे शतक अवघ्या २ धावांनी हुकले

नवी दिल्ली | New Delhi

भारत आणि न्यूझीलंड (India and New Zealand) यांच्यात वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाने ४ बाद ४८६ धावा उभारून सामन्यावर भक्कम पकड मिळवली आहे. भारताने न्यूझीलंडवर ११८ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. सलामीवीर के.एल. राहुलने १३६ धावांची दमदार शतकी खेळी केली, तर कर्णधार शुभमन गिलचे शतक अवघ्या दोन धावांनी हुकले आणि तो ९८ धावांवर बाद झाला.

- Advertisement -

के.एल. राहुलने (KL Rahul) या खेळीदरम्यान कसोटी क्रिकेटमधील आपले १३ वे शतक पूर्ण केले. सलामीवीर म्हणून हे त्याचे १२ वे कसोटी शतक ठरले असून, यासह त्याने अजिंक्य रहाणे आणि मुरली विजय यांच्या कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी साधली. दुसरीकडे, शुभमन गिल २०१४ नंतर न्यूझीलंडच्या भूमीवर कसोटी अर्धशतक झळकावणारा महेंद्रसिंग धोनीनंतरचा पहिला भारतीय कर्णधार ठरला. विशेष म्हणजे, न्यूझीलंडमध्ये खेळताना कोणत्याही पाहुण्या संघाच्या आघाडीच्या चार फलंदाजांनी ८० पेक्षा अधिक धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

भारतीय संघाने (Team India) १ बाद १५९ या धावसंख्येवरून तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. के.एल. राहुल आणि देवदत्त पडिक्कल यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर आक्रमण करत १६५ धावांची मोठी भागीदारी रचली आणि संघाला भक्कम स्थितीत नेले. देवदत्त पडिक्कल ८० धावांवर काईल जेमिसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार शुभमन गिलने के.एल. राहुलसोबत ९१ धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. शतकी खेळीनंतर १३६ धावांवर नॅथन स्मिथने के.एल. राहुलला बाद करत ही जोडी फोडली.

दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या रिषभ पंतनेही आक्रमक फलंदाजी करत शुभमन गिलसोबत (Shubhman Gill) शतकी भागीदारी रचली आणि कसोटी कारकीर्दीतील आपले २२ वे अर्धशतक पूर्ण केले. मात्र, दिवसाच्या शेवटच्या षटकात जेकब डफीच्या गोलंदाजीवर शुभमन गिल ९८ धावांवर त्रिफळाचीत झाला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रिषभ पंत ५५ धावांवर नाबाद होता, तर नाईट वॉचमन म्हणून बढती मिळालेला अंशुल कंबोज शून्यावर नाबाद परतला.

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळ यांचे तत्कालीन खासगी सचिव डॉ. रामदास गाडे निलंबित;...

0
मुंबई | Mumbai राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ (Minister Narhari Zirwal) यांचे तत्कालीन खासगी सचिव डॉ. रामदास गाडे (Ramdas Gade) यांना राज्य...