मुबंई | Mumbai
भारत आणि ऑस्ट्रेलिया (India-Australia) यांच्यात ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा (Series ) थरार आटोपल्यानंतर आजपासून (दि.२९ ऑक्टोबर) टी २० मालिका खेळविण्यात येत आहे. या मालिकेत उभय संघांमध्ये ५ सामने खेळविण्यात येणार असून, सलामीचा सामना कॅनबेरा येथील मनुका ओव्हल मैदानावर खेळविण्यात येणार आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे (Suryakumar Yadav) तर मिचेल मार्शकडे (Mitchell Marsh) ऑस्ट्रेलिया संघाची धुरा असणार आहे. भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळताना दुबई आणि अबुधाबी येथे झालेल्या आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया संघाला आव्हान देण्यासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे सूर्यकुमार यादव प्रथमच ऑस्ट्रेलिया धर्तीवर भारतीय संघाचे कर्णधारपद भूषविणार आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलंड विरुद्ध पार पडलेल्या अखेरच्या मालिकेत मिचेल मार्शच्या नेतृत्वाखाली खेळताना ३-० ने मालिका विजय संपादन केला आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघांमध्ये ३२ टी २० सामने खेळविण्यात आले असून, भारतीय संघाने (Team India) २० तर ऑस्ट्रेलिया ने ११ सामन्यात विजय संपादन केला आहे. भारतीय संघाच्या फलंदाजीची मदार सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, तिलक वर्मा, रिंकूसिंग, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, शिवम दुबे यांच्यावर असणार आहे.तर यष्टीरक्षक फलंदाज म्हणून जितेश शर्मा आणि संजू सॅमसन संघात आहेत. अष्टपैलू खेळाडूंमध्ये शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अरर पटेल, अभिषेक शर्मा हे पर्याय उपलब्ध आहेत. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदिपसिंग, कुलदीप यादव वरूण चक्रवर्ती आहेत.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघाच्या फलंदाजीची मदार मिचेल मार्श, ट्रॅव्हिस हेड,जाॅश इंग्लिश, जाॅश फिलीपे,टीम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट यांच्यावर असणार आहे. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून जाॅश इंग्लिश, आणि जाॅश फिलीपे संघात आहेत.अष्टपैलू खेळाडूंमध्ये मिचेल मार्श, मायकेल ओव्हन, मार्कस स्ट्रॉईनीस, ग्लेन मॅक्सवेल आहेत. गोलंदाजीत झेवियर बार्टलेट, मॅथ्यू कुनेमन, नॅथन एलिस, शाॅन अॅबाॅट हे पर्याय उपलब्ध आहेत.




