कोलकाता | Kolkata
आयसीसी पुरुष टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये आज (रविवारी) कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यात सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता सामन्यास सुरुवात होईल. या सामन्यात विजय संपादन करून उपांत्य फेरीत आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी दोन्ही संघ सज्ज असणार आहेत.
सुपर ८ मध्ये (Super 8) पार पडलेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला ७६ धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र गुरुवारी चेन्नई येथे पार पडलेल्या सामन्यात भारतीय संघाने (Team India) ७२ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीच्या लढतीत आपले आव्हान कायम राखले आहे.
दुसरीकडे वेस्ट इंडिजने झिंबाब्वे विरूध्द १०७ धावांनी दणदणीत विजय संपादन करून सुपर ८ मध्ये दणक्यात सुरुवात केली होती. दक्षिण आफ्रिका विरूध्द ९ गडी राखून पराभव स्वीकारावा लागल्यामुळे वेस्ट इंडिज संघाच्या विजयी मोहिमेला ब्रेक लागला आहे. त्यामुळे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामना क्वार्टर फायनल सारखा असणार आहे. पराभूत संघाला स्पर्धेबाहेर पडावे लागणार आहे.
वेस्ट इंडिज संघाचे कर्णधारपद यष्टीरक्षक फलंदाज शाई होपकडे सोपविण्यात आले आहे. तर सूर्यकुमार यादवकडे भारतीय संघाचे कर्णधारपद असणार आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर भारतीय संघाने ७ टी २० सामने खेळले असून, ६ सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच वेस्ट इंडिज विरूध्द ४ सामने खेळले असून, सर्व सामने जिंकले आहेत. विश्वचषक स्पर्धेमध्ये दोन्ही संघांमध्ये ४ सामने खेळले गेले असून, वेस्ट इंडिज ने ३ सामने जिंकले असून, भारतीय संघ १ सामन्यात विजयी झाला आहे.
दरम्यान, हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास भारतीय संघाने १९ सामने जिंकले आहेत. तर १० सामन्यात वेस्ट इंडिजने बाजी मारली आहे. १ सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघ विश्वचषक स्पर्धेमध्ये या मैदानावर एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत. भारतीय संघ यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये कोलकाता येथे सामना खेळणार आहे. तर वेस्ट इंडिज ने २ सामने खेळले असून, इटली आणि स्कॉटलँड विरूध्द विजय संपादन केला आहे.




