मुंबई | Mumbai
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि पलाश मुच्छल (Palash Muchhal) यांचा विवाह सोहळा आज (रविवारी) सांगलीत पार पडणार होता. त्यासाठी मोठ्या थाटात तयारी करण्यात आली होती. विशेष म्हणजे हळद, संगीत नाईट असे वेगवेगळे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आले. मात्र, या आनंदाच्या क्षणी अचानक विघ्न आले आहे. स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना (Srinivas Mandhana) यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर आता वडिलांची प्रकृती लक्षात घेता स्मृती मानधना हिने आपले लग्न पुढे ढकलले आहे.
स्मृती मानधना यांच्या कुटुंबातील तोहीन मिश्रा यांनी याबाबत माहिती देतांना सांगितले की,”आज सकाळी अचानकपणे स्मृती मानधना यांच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने विवाह सोहळ्यात (Marriage) गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉक्टरांनी लागलीच उपचार सुरू केले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच पुढील उपचार डॉक्टरांच्या देखरेखीखाली सुरु आहेत. जोपर्यंत वडिलांची तब्येत पूर्णपणे स्थिर होत नाही, तोपर्यंत लग्नाचा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय पलाश मुच्छल आणि मानधना कुटुंबीयांनी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन एकमताने घेतला आहे”,असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, स्मृतीच्या कुटुंबीयांनी चाहत्यांना आणि माध्यमांना विनंती केली आहे की, वडिलांच्या (Father) प्रकृतीबाबत अफवा न पसरवता त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करावी. तसेच लग्न स्थळाच्या ठिकाणावरून येणाऱ्या पाहुण्यांना घरी जाण्यास सांगण्यात आले असून,लग्न स्थळाचे डेकोरेशन काढण्याचे काम सुरू आहे. स्मृती मनधाना आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छल यांचा संध्याकाळी सांगलीमध्ये साडेचार वाजता लग्न सोहळा पार पडणार होता. या लग्न सोहळ्यासाठी क्रीडा आणि विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार होते.
आधी केलं एकमेकांना डेट नंतर घेतला लग्नाचा निर्णय
स्मृती आणि पलाश हे २०१९ पासून एकमेकांना डेट करत होते. सुरुवातीला दोघांनीही आपले रिलेशनशिप खाजगी ठेवले होते. मात्र, २०२४ मध्ये त्यांच्या नात्याची अधिकृत माहिती समोर आली. याच वर्षी पलाशने नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये सर्वांसमोर गुडघ्यावर बसून स्मृतीला प्रपोज केल्याचा रोमँटिक क्षण व्हायरल झाला होता. तसेच दोघांचा अजून एक रोमँटिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये दोघेही सलमान खानच्या ‘सलाम-ए-इश्क’ चित्रपटातील गाणं तेनू लेके मैं जाउंगा… या गाण्यावर नाचताना दिसत होते.




