मुंबई | Mumbai
भारत आणि इंग्लंड (India and England) यांच्यातील टी-२० मालिकेचा रोमांच आजपासून (बुधवार) सुरू होणार आहे. इंग्लंडचा संघ (England Team) भारत दौऱ्यावर ५ टी-२० सामने तसेच तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्यातील पहिला टी-२० सामना आज कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळविण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. तर सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर करण्यात येणार आहे.
या मालिकेसाठी भारतीय संघाची धुरा सुर्यकुमार यादवकडे (Suryakumar Yadav) असणार आहे, तर जॉस बटलर (Joss Buttler) इंग्लंड संघाची कमान सांभाळणार आहे. भारतीय संघाने आपल्या अखेरच्या टी २० मालिकेत सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध ४ सामन्यांच्या मालिकेत ३-१ ने मालिका विजय संपादन केला आहे. विशेष म्हणजे सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने (Indian Team) अद्याप एकही मालिका गमावलेली नाही. त्यामुळे आपली विजयी लय कायम राखण्यासाठी भारतीय संघ सज्ज असणार आहे. दुसरीकडे इंग्लंडने आपल्या अखेरच्या टी २० मालिकेत वेस्टइंडिज विरूध्द ३-१ ने मालिका विजय संपादन केला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात टी २० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेमध्ये खेळविण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात ६८ धावांनी दणदणीत विजय संपादन केला होता. या पराभवाची परतफेड करण्यासाठी इंग्लंड सज्ज असणार आहे. इंग्लंड आणि भारतीय संघामध्ये २४ सामने खेळविण्यात आले असून यात भारतीय संघाचा दबदबा राहिला आहे. भारतीय संघाने १३ तर इंग्लंडने ११ सामन्यात विजय संपादन केला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड संघामध्ये २०१६-१७ मध्ये खेळविण्यात आलेल्या ३ सामन्यांच्या टी २० मालिकेत भारताने २-१ तसेच २०२०-२१ मध्ये खेळविण्यात आलेल्या ५ सामन्यांच्या मालिकेत ३-२ ने मालिका विजय संपादन केला आहे.
टी-२० मालिकेसाठी दोन्ही संघ पुढीलप्रमाणे
भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद. शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).
इंग्लंडचा संघ
जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक (उपकर्णधार), ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल साल्ट, मार्क वूड.