मुंबई | Mumbai
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (गुरुवारी) कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (Kolkata Knight Riders and Sunrisers Hyderabad) यांच्यात सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता खेळविण्यात येणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचे कर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे (Ajinkya Rahane) तर पॅट कमिन्सकडे (Pat Cummins) सनरायझर्स हैदराबाद संघाचे कर्णधारपद असणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये दोन्ही संघांत २५ सामने खेळविण्यात आले असून, हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास कोलकाता नाईट रायडर्स संघाने १६ तसेच सनरायझर्स हैदराबादने ९ सामन्यात विजय संपादन केला आहे. तर ईडन गार्डन्स मैदानावर खेळविण्यात आलेल्या ९ पैकी ३ सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला पराभव स्वीकारावा लागला आहे.
आयपीएल २०२५ (IPL 2025) च्या स्पर्धेमध्ये दोन्ही संघांची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने आपल्या घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्स विरूध्द ४४ धावांनी विजय संपादन करून विजयी सलामी दिली होती. मात्र, लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स विरूध्द सलग दोन सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स संघाला सलामीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूध्द ७ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता.
मात्र, गुवाहाटी (Guwahati) येथे राजस्थान रॉयल्स विरूध्द कोलकाता नाईट रायडर्सने ८ गडी राखून दणदणीत विजय संपादन करून विजयी सलामी दिली होती. तर सोमवारी मुंबई इंडियन्स विरूध्द वानखेडे मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला ८ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे विजयी मार्गावर परतण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स उत्सुक असणार आहेत.