मुंबई | Mumbai
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट (Team India) संघाला ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. दोन्ही डावात भारतीय संघाची फलंदाजी खराब राहिली, त्यामुळे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. भारताने पहिल्या डावात केवळ १८० धावा केल्या होत्या, तर ऑस्ट्रेलियाने ३३७ धावा केल्या. दुसऱ्या डावात भारतीय संघ १७५ धावांत गारद झाला.
ऑस्ट्रेलियाला (Australia) विजयासाठी केवळ १९ धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी सहज गाठले.या पराभवानंतर भारतीय संघ कसोटी चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर घसरला. भारताचा (India) पीसीटी आता ५७.२९ वर आहे, तर ऑस्ट्रेलिया ६०.७१ पीसीटी गुणांसह पहिल्या आणि दक्षिण आफ्रिका ५९.२६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या शर्यतीत श्रीलंका संघाचाही समावेश आहे. जे फायनलमध्ये पोहोचू शकतात. अशा परिस्थितीत या चार देशांचे अंतिम फेरीत जाण्याचे समीकरण काय आहे ते पाहूया.
टीम इंडियासाठी समीकरण? उर्वरित सामने -३ (ऑस्ट्रेलियाविरुद्ध)
भारत अजूनही फायनलमध्ये पोहोचू शकतो, पण त्यासाठी प्रत्येक सामना जिंकणे आवश्यक असेल. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचे उर्वरित तीन सामने जिंकल्यास पीसीटी ६४.०५ पर्यंत जाईल. भारताने ही मालिका ४-१ ने जिंकल्यास ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्धची आगामी मालिका जिंकली तरी अंतिम फेरीत त्यांचे स्थान निश्चित होईल.
ऑस्ट्रेलियासाठी समीकरण? उर्वरित सामने – ५ (३) भारताविरुद्ध, २ श्रीलंकेविरुद्ध)
ॲडलेडमधील विजयासह ऑस्ट्रेलियाने आपली जागा अजून मजबूत केली आहे. त्यांनी सर्व सामने जिंकल्यास पीसीटी ७१.०५ पर्यंत पोहोचेल. भारताविरुद्ध आणखी दोन विजय आणि श्रीलंकेवर क्लीन स्वीप केल्याने फायनलमधील स्थान निश्चित होईल.
आफ्रिकेसाठी समीकरण? उर्वरित सामने – ३ (श्रीलंकेविरुद्ध १, पाकिस्तानविरुद्ध २)
दक्षिण आफ्रिकेलाही अंतिम फेरी गाठण्याची चांगली संधी आहे. त्यांनी तिन्ही सामने जिंकल्यास पीसीटी ६९.४४ होईल. जर त्यांनी श्रीलंकेचा पराभव केला आणि पाकिस्तानविरुद्ध १-१ अशी बरोबरी साधली तर पीसीटी ६१.११ होईल.
श्रीलंकेसाठी समीकरण ? उर्वरित सामने – ३ (१ द. आफ्रिकेविरुद्ध, २ ऑस्ट्रेलियाविरुद्ध)
अंतिम फेरी गाठण्यासाठी श्रीलंकेला सर्व सामने जिंकावे लागतील. त्यांनी तिन्ही सामने जिंकल्यास पीसीटी ६१.५३ होईल. जर त्यांनी फक्त दोन सामने जिंकले तर त्यांचे पीसीटी ५३.८४ होईल. अशा स्थितीत त्यांना सर्व सामने जिंकणे आवश्यक आहे.