पुणे । प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळपासून जोरदार आंदोलनाला सुरुवात केली. निकालात झालेल्या गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गेटवरून प्रवेश करत थेट मुख्य इमारतीसमोर ठिय्या आंदोलन छेडले.
विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, निकालामध्ये गंभीर त्रुटी झाल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांना चुकीचा ग्रेस (अनुत्तीर्णतेपासून वाचवण्यासाठी दिले जाणारे गुण) देण्यात आला असून, परीक्षेतील एकसंध निकष पाळले गेलेले नाहीत. उदाहरणार्थ, ५० गुणांच्या पेपरसाठी १०% म्हणजे ५ ग्रेस गुण मिळणे अपेक्षित असताना, एका विद्यार्थिनीला ९ गुण मिळाले असून देखील तिच्या गुणात ११ मार्क्सची वाढ करून २० गुण देण्यात आले आहेत. ही बाब अन्य विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
विद्यापीठाच्या गेटवर सुरक्षेचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. सुरुवातीला आंदोलक विद्यार्थ्यांना आत प्रवेश नाकारण्यात आला. मात्र, संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे मुख्य गेट तोडून आत प्रवेश केला आणि मुख्य इमारतीसमोर आंदोलन सुरु केले. शेकडो विद्यार्थी हातात फलक घेऊन ‘निकालातील अन्याय दूर करा’, ‘आमची परीक्षा पुन्हा घ्या’, अशा घोषणा देत ठिय्या आंदोलन करत आहेत.
विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी म्हणजे निकालातील घोळाची चौकशी करावी आणि गरज असल्यास संपूर्ण परीक्षा पुन्हा घ्यावी. तसेच, या विषयावर विद्यापीठाचे कुलगुरू थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधावा आणि ठोस निर्णय घ्यावा, अशी विद्यार्थ्यांची भूमिका आहे.
“निकालात मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे. एकाच पेपरमध्ये कोणाला ५ ग्रेस, तर कोणाला ११ मार्क्सची वाढ करून पास केलं जातंय. हे आम्हाला मान्य नाही. कुलगुरूंनी आमचं निवेदन स्वीकारेपर्यंत आणि यावर ठोस निर्णय घेईपर्यंत आम्ही इथून हलणार नाही,” अशी भूमिका विद्यार्थ्यांनी स्पष्ट केली आहे.
या आंदोलनामुळे विद्यापीठ प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य की प्रशासनाने चुकीचा निर्णय घेतला याची चौकशी होणे अत्यावश्यक ठरते. सध्या आंदोलन सुरूच असून, प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप देण्यात आलेली नाही.




