अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
एसटी बस चालकाला रस्त्यात वाहन आडवे लावून मारहाण केल्याची घटना शनिवारी (6 डिसेंबर) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास शहरातील केडगाव बायपास ओव्हरब्रिज खाली घडली. भटु निलकंठ पाटील (वय 47 रा. बिलाली, ता. अंमळनेर, जि. जळगाव) असे मारहाण झालेल्या चालकाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा आगारातील चालक भटु पाटील हे एमएच 14 एल एक्स 8949 ही एसटी बस घेऊन कर्तव्यावर होते. वाहक दिनकर पौलाद पवार यांच्यासोबत ते बस घेऊन पुणे दिशेने जात होते. अहिल्यानगर शहरातून बस निघाल्यावर केडगाव बायपासजवळ पहाटे 5:30 च्या सुमारास त्यांच्या पुढील बाजूस असलेल्या एमएच 16 बीएम 1011 या क्रमांकाच्या कारच्या चालकाने अचानक स्पीडब्रेकरजवळ रस्त्याच्या मधोमध कार थांबवली. कारमधील दोन इसम खाली उतरून आले आणि त्यांनी लगेच एसटी चालकाला शिवीगाळ केली.
चालक कॅबिनचा दरवाजा उघडून पाटील यांना खाली ओढण्याचा प्रयत्न केला. याच झटापटीत एका हल्लेखोराने धारदार हत्याराने चालक पाटील यांच्यावर वार करून त्यांना जखमी केले. ही घटना पाहून वाहक पवार यांनी तत्काळ बसचा दरवाजा उघडल्याने बसमधील प्रवासी मदतीसाठी खाली उतरले. हल्लेखोरांनी त्यांचीही गचांडी धरून धक्काबुक्की केली. तसेच बसमध्ये चढून महिला आणि पुरूष प्रवाशांना शिवीगाळ करत धमकावले आहे.
दरम्यान, सदर घटनेनंतर चालक पाटील यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला व फिर्याद दिली. पाटील यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कारमधील अनोळखी चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.




