पुरी (ओडिशा)
भगवान जगन्नाथ यांच्या ऐतिहासिक रथयात्रेदरम्यान गुरुवारी मोठी दुर्घटना घडली. लाखो भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली. या दुर्घटनेत एका भाविकाचा मृत्यू झाला असून २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. अनेकांना श्वास घेण्यास त्रास झाल्याने तसेच बेशुद्ध पडल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रथयात्रेच्या मुख्य मार्गावर अचानक झालेल्या गर्दीच्या दाटीमुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी तैनात पोलिस, आपत्कालीन प्रतिसाद पथक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. स्ट्रेचर आणि रुग्णवाहिकांच्या मदतीने जखमींना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले.
यंदाच्या रथयात्रेसाठी लाखो भाविक पुरीत दाखल झाले होते. गर्दी नियंत्रणासाठी सुमारे १३ हजार पोलीस कर्मचारी, वरिष्ठ अधिकारी, सीसीटीव्ही देखरेख आणि अन्य सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मात्र, भाविकांची संख्या अपेक्षेपेक्षा अधिक झाल्याने काही ठिकाणी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे वृत्त आहे.
घटनेनंतर ओडिशा प्रशासनाने जखमींवर उपचार सुरू असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे. दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून गर्दी व्यवस्थापनात काही त्रुटी राहिल्या का, याचाही तपास केला जाणार आहे.




