Friday, October 2, 2026
HomeनगरAhilyanagar : राज्यात 20 तर नगर जिल्ह्यात 32 टक्के पावसाची तूट

Ahilyanagar : राज्यात 20 तर नगर जिल्ह्यात 32 टक्के पावसाची तूट

मान्सूनचा हंगाम संपला || मध्य महाराष्ट्रातील काही भागात परतीच्या हलक्या सरींचा अंदाज

मुंबई/ अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राज्यात जुलैमध्ये सर्वदूर पाऊस झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमीच होते. सप्टेंबरमध्येही पावसाने ओढ दिल्याने 52 टक्के पावसाची तूट निर्माण झाली. मोसमी पावसाचा हंगाम संपला असून संपूर्ण हंगामात राज्यात (1 जून ते 30 सप्टेंबर) पावसाची तूट 19 तर नगर जिल्ह्यात 32 टक्के इतकी आहे. सध्या राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत असली तरीही आता वादळी पावसाचा प्रभाव कमी होण्याचा अंदाज आहे.

- Advertisement -

यंदा हवामान बदलाचे परिणाम तीव्र झाले आहेत. मोसमी पावसाच्या सुरुवातीपासूनच राज्यात सर्वदूर पावसाचा अभाव होता. यंदाच्या संपूर्ण हंगामावर प्रशांत महासागरातील एल निनोच्या स्थितीचा प्रभाव असेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. जून महिन्यातही सरासरीहून कमी पाऊस झाला. त्यानंतर जुलै महिन्यात सक्रिय हवामान प्रणालींमुळे राज्यात सरासरीहून अधिक आणि सर्वदूर पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे राज्यातील नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, ऑगस्ट महिन्यापासून पावसाचा जोर ओसरला, तसेच या महिन्यात सरासरीहून कमी पाऊस नोंदला गेला. दरम्यान, सप्टेंबर महिन्यताही पावसाने ओढ दिल्याने राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि कोकण प्रदेशातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाची मोठी तूट कायम राहिली. राज्यात सप्टेंबरमध्ये 180.3 मिमी पाऊस अपेक्षित असतो, यंदा यादरम्यान 87 टक्के पावसाची नोंद झाली. त्यामुळे दुष्काळाची झळ अधिकच तीव्र झाली.

दरम्यान, देशातील उत्तर आणि मध्य भारतातील काही भागातून मोसमी पावसाने माघार घेतली असून पुढील 2 ते 3 दिवसांत गुजरात आणि मध्य प्रदेशच्या बहुतांश भागांसह महाराष्ट्रातील काही भागातून मोसमी पावसाच्या पुढील माघारीसाठी परिस्थिती अनुकूल होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात राज्यात मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुढील काही दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलक्या सरींचा अंदाज असून उर्वरित राज्यातील बहुतांश भागात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात संपूर्ण मोमसी पावसाच्या हंगामात सरासरीच्या 81 टक्के इतकी पावसाची नोंद झाली असून संपूर्ण देशात पावसाची तूट 13 टक्के इतकी आहे. गेल्यावर्षी संपूर्ण हंगामात सरासरीच्या 120 टक्के पाऊस झाला होता.

पाच तालुक्यात निम्म्यापेक्षा कमी पाऊस
नगर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान अवघा 67.5 टक्के पाऊस झालेला आहे. जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात सुमारे 32 टक्के पावसाची त्रुट आहे. यात पाच तालुक्यात जिल्ह्यातील 448.1 मि.मी. सरासरी पाऊस अपेक्षीत असतांना सरासरीच्या 50 टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झालेली आहे. यात राहुरी, श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव आणि शेवगाव तालुक्याचा समावेश आहे. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान 299 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झालेली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : यंदा नगरचा गाळप हंगाम अवघ्या 100 दिवसांचा !

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पावसाची बिकट परिस्थिती, पाण्याची कमतरता आणि गाळपासाठी उपलब्ध होणार्‍या उसाचे घटलेले क्षेत्र यामुळे ऊस उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नगरच्या साखर कारखानदारीसमोर...