अकोले |प्रतिनिधी| Akole
राज्यातील लहान, मध्यम व मोठ्या मिळून सुमारे 3028 धरणांमध्ये 30 एप्रिल 2026 अखेर 39.62 टक्के (571.467 टीएमसी) इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपत्ती अभ्यासक इंजि. हरिश्चंद्र चकोर यांनी दिली. गतवर्षी याच दिवशी हा साठा 34.48 टक्के (497.329 टीएमसी) होता. यंदा सुमारे 5.14 टक्के (74.135 टीएमसी) अधिक पाणी उपलब्ध आहे.
राज्यातील सहा महसुली विभागांनुसार पाणीसाठ्याची स्थिती पुढीलप्रमाणे आहे- कोकण विभागात 173 धरणांमध्ये 56.022 टीएमसी (42.82 टक्के), नाशिक विभागात 539 धरणांमध्ये 87.907 टीएमसी (41.80 टक्के), पुणे विभागात 724 धरणांमध्ये 174.565 टीएमसी (32.40 टक्के), मराठवाडा विभागात 929 धरणांमध्ये 113.879 टीएमसी (44.25 टक्के), अमरावती विभागात 276 धरणांमध्ये 66.057 टीएमसी (47.64 टक्के) तर नागपूर विभागात 387 धरणांमध्ये 73.027 टीएमसी (43.83 टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. अमरावती विभागात सर्वाधिक (47.64 टक्के) तर पुणे विभागात सर्वात कमी (32.4 टक्के) पाणीसाठा नोंदवला गेला आहे.
राज्यातील प्रमुख धरणांपैकी उजनी धरणात 6.027 टीएमसी (11.24 टक्के), कोयना धरणात 27.85 टीएमसी (27.82 टक्के) आणि जायकवाडी धरणात 36.72 टीएमसी (47.84 टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील सुमारे 13 प्रकल्पांमध्ये एकूण 27.78 टीएमसी पाणीसाठा असून तो गतवर्षीपेक्षा सुमारे 6 टीएमसीने अधिक आहे. भंडारदरा धरणात 4.991 टीएमसी (45.21 टक्के), निळवंडे धरणात 4.412 टीएमसी (55.99 टक्के), मुळा धरणात 13.531 टीएमसी (52.64 टक्के), आढळा धरणात 0.605 टीएमसी (57.08 टक्के), सीना प्रकल्पात 1.207 टीएमसी (50.29 टक्के), घोड धरणात 1.942 टीएमसी (32.38 टक्के) तर भोजापूर प्रकल्पात सुमारे 6.93 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.
सध्या रब्बी हंगाम संपून उन्हाळी हंगाम सुरू झाला आहे. उपलब्ध पाणीसाठ्यामुळे सिंचनासाठी काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो आणि पिण्याच्या पाण्याची तातडीची टंचाई अपेक्षित नसली, तरी वाढते तापमान व बाष्पीभवनामुळे पाण्याचा वापर काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता असल्याने 31 ऑगस्टपर्यंत पाणी नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.
पुण्यासाठी महत्त्वाच्या खडकवासला धरणसमूहात 10.27 टीएमसी (35.22 टक्के) पाणीसाठा असून तो गतवर्षीपेक्षा सुमारे 4 टक्क्यांनी अधिक आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण पाणीसाठा 40.15 टक्के असून गंगापूर धरणात 2.282 टीएमसी (51.19 टक्के), दारणा धरणात 2.803 टीएमसी (39.21 टक्के) आणि कडवा धरणात 0.412 टीएमसी (29.35 टक्के) पाणी उपलब्ध आहे. दरम्यान, जायकवाडी प्रकल्पात दररोज सुमारे 80 दशलक्ष घनफूट बाष्पीभवन होत असून दरमहा अंदाजे 2.5 ते 3 टीएमसी पाणी घटण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे ऑगस्टअखेरपर्यंत पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याची गरज व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण सुनिश्चित करण्यासाठी संबंधित विभागांना निर्देश दिले आहेत.
राज्यातील काही प्रमुख धरणांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे- गोसीखुर्द 13.00 टीएमसी (49.75 टक्के), पेंच प्रकल्प 19.19 टीएमसी (53.43 टक्के), गिरणा धरण 7.52 टीएमसी (47.66 टक्के), मध्य वैतरणा 6.00 टीएमसी (51.25 टक्के), माजलगाव 4.608 टीएमसी (41.92 टक्के), मांजरा 2.332 टीएमसी (37.37 टक्के) आणि भातसा धरण 14.68 टीएमसी (44.12 टक्के).





