Saturday, May 2, 2026
Homeनगरराज्य नाट्य स्पर्धा : ‘एआय’च्या परिणामांवर चर्चा करणारे ‘लुई दागेरी ते पिकासो’

राज्य नाट्य स्पर्धा : ‘एआय’च्या परिणामांवर चर्चा करणारे ‘लुई दागेरी ते पिकासो’

संदीप जाधव | अहिल्यानगर

सध्या कृत्रिम बुद्धीमत्तेचा म्हणजेच आर्टिफिशीअल इन्टीलिजेन्सचा (एआय) बोलबाला आहे. प्रत्येक क्षेत्रात त्याचा शिरकाव झालाय. वेळेची बचत, मानवी चुकांचा अभाव यामुळे एआयचा वापर महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र, एआयमुळे कला क्षेत्रात बेरोजगारीचं संकट ओढल्याची भीतीही आहेच. चित्रपटात होत असलेला एआयचा वापर कलाकारांच्या बेरोजगारीला कारणीभूत असल्याचा आरोप होतोय. दुसरीकडे एआयच्या वापरामुळे फायदा होत असल्याने त्याचा समर्थन करणाराही एक वर्ग आहे. या मतमतांतरांतर या नवीन तंत्रज्ञानाला संकट न मानता त्याचे रूपांतर संधीत करायला हवे, या विषयावर चर्चात्मक चिकित्सा करणारे ‘लुई दागेरी ते पिकासो’ नाटक राज्य नाट्य स्पर्धेत शुक्रवारी (28 नोव्हेंबर) रंगमंचावर पाहायला मिळाले.

- Advertisement -

अहिल्यानगरच्या सप्तरंग थिएटर्सने सादर केलेल्या या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक डॉ. श्याम शिंदे होते. एआयच्या वापराने होत असलेले फायदे दर्शवितानाच त्याला संकट मानणार्‍या वर्गाची अवस्था नाटकाने दाखविली. त्यासाठी एकोणिसाव्या शतकातील लुई दागेरी, पाब्लो पिकासो आदी परदेशी कलाकारांचा संदर्भ नाटकात देण्यात आला. एआयच्या वापराचे फायदे-तोटे सांगून या स्थितीत कलाकारांनी कसे सावरायचे याचा ऊहापोह करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक डॉ. शिंदे यांनी नाटकात केला.

नाटकाची सुरुवात महाभारतावर आधारित ‘राधेय’ या चित्रपटाच्या दृश्याने होते. एआयचा वापर करून यशस्वी झालेल्या या चित्रपटाने शेकडो कोटींची कमाई केली. चित्रपटाचा निर्माता जतीन शाह एआयचे समर्थन करतो. चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो. अनेकजण त्याच्याबरोबर भागीदारीसाठी तयार होतात. दरम्यानच्या काळात सांस्कृतिक मंत्रीसुद्धा त्याचे कौतूक करतात. या प्रसंगांत चित्रपट व्यवसायाचा राजकीयांशी असलेले संबंध अधोरेखित केला गेला. याच पार्टीत राधिका-अभिजीत हे दोन्ही उमदे कलाकार येतात. तेथेच अभिजीतला सुहास या आर्ट डायरेक्टरच्या आत्महत्येची खबर मिळते. मग संतापलेला अभिजीत सुहासच्या आत्महत्येला जबाबदार धरून जतीन शहावर हल्ला करतो. याची जोरदार चर्चा मीडियात होते.

या प्रकारानंतर राधिका अभिजीतला माफी मागायला लावते. मात्र, तो आपल्या भूमिकेवर ठाम असतो. हे हल्ला प्रकरण चित्रपट महामंडळाकडे जाते. त्यावर चर्चा करण्यासाठी महामंडळाचे अध्यक्ष शिंदे बैठक बोलवितात. बैठकीस जाण्यास अभिजीत नकार देतो. मात्र, राधिका त्याच्यावतीने संमती दर्शविते. या प्रसंगाने नाटकाचा पहिला अंक संपतो. दुसर्‍या अंकाची सुरुवात महामंडळाच्या बैठकीने होते. चित्रपट क्षेत्राची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण आपसात मिटविण्याचे अध्यक्ष सूचवितात. मात्र, शहाची माफी मागण्यास अभिजीत स्पष्ट नकार देतो. राधेय हा चित्रपट एआयचा वापर करून बनविला असल्याने त्याचा परिणाम चित्रपटातील अनेक तांत्रिक, अतांत्रिक काम करणार्‍या घटकांवर झाल्याचा आरोप तो करतो. उद्विग्न होऊन आपल्या यशाचा संघर्ष सांगतो. चित्रपट क्षेेत्रात एआयचा शिरकाव झाल्याने त्याचे भविष्यकालीन धोके सांगतो. एआयच्या संकटामुळे कर्जबाजारी झालेल्या आर्ट डायरेक्टर सुहासने आत्महत्या केल्याचे त्याचा सहकारी दीपक सांगतो.

नंतर राधिकाही एआयविरोधी मत मांडते. तिनेही चित्रपट क्षेत्रात येण्यासाठी मोठा संघर्ष केलेला. स्वतःची कहाणी सांगतानाच चित्रपट क्षेत्रातील कास्टिंग काऊच, कॉम्पोमाईज आदी मुद्यांवर बोट ठेवते. जतीन शहाने कलाकारांना बाजूला सारून एआयच्या साह्याने चित्रपट बनविण्यावर ती सडकून टीका करते. या सर्वांचे मत ऐकल्यानंतर ज्येष्ठ कलाकार राजमाने एआयच्या वापराचे दुष्परिणाम सांगतात. एआयच्या दुरूपयोगावरही भाष्य करतात. चित्रपटात एडिटर असलेला देसाई मात्र एआयचे समर्थन करतो. चित्रपटाच्या यशात दुय्यम स्थान मिळणार्‍या कलाकारांची अवस्थता कथन करतो. जतीन शहा निर्मात्यांच्या समस्या सांगतो. चित्रपटात एआयचा वापर योग्य मानतो. मग राजमाने सांगतात की, एआयमुळे होणार्‍या परिणामांना घाबरणे योग्य नाही. डॉक्टर, शेतकरी, पोलिस यंत्रणेसह अनेक क्षेत्रात एआयचा चांगला वापर होतोय. 150 वर्षांपूर्वी संगीत नाटकांवर अनेक संकटे आली.

मात्र, तरीही ती तगली. 1937 साली लुई दागिरी या फ्रेंच कलाकाराने कॅमेर्‍याचा शोध लावला. त्यामुळे चित्रकारांच्या मनात धडकी भरली. मात्र, चित्रकारांचे महत्त्व कमी झाले नाही. पाब्लो यांनी बदलत्या काळात आपल्या चित्रशैलीत बदल करून जगभरातील लोकांना प्रभावित केले. त्यामुळे एआयला संकट न मानता त्याचे रूपांतर संधीत करायचे हवे. जिगिशावृत्तीने बदल स्विकाकरले पाहिजे. कुठल्याही स्थित्यंतराला घाबरायचे नाही असा सल्लाही राजमाने देतात. या सर्व चर्चेनंतर अभिजीत माफी मागतो व वादावर पडदा पडतो. एआयचा कितीही वापर होत असला तरी कलाकारांच्या मूळ कलेचा सन्मान होतच राहणार असेही नाटकाने अधोरेखित केले. सर्वत्र वापर होत असलेल्या एआय या नव्या विषयावरील नाटकाचे लेखन डॉ. श्याम शिंदे यांनी केले. त्यास रंगमंचावर उतरविले. पहिल्या अंकात अनेक घडामोडी झाल्या. मात्र, दुसर्‍या अंकात एआयच्या मुदद्द्यावर चर्चासत्रच झाल्याचे वाटले. एआयचे फायदे-तोटे सांगतानाच त्यात कसे टिकायचे याचा नेमका संदेश देण्याचा प्रयत्न मात्र नाटकाने केला.

जतीन शहा हे पात्र अविनाश कराळे यांनी आत्मविश्वासाने वठवले. विविध हावभाव व मराठी-हिंदीतील स्पष्ट संवाद समर्पक वाटले. देहबोलीही निर्मात्याच्या थाटाची होती! पार्टीत वाधवानींच्या रूपात आलेल्या अजयकुमार पवार यांनी चांगले संवाद केले, तर पाटील यांना डॉ. काशिनाथ सुलाखे यांनी रंगमंचावर आणले. मद्याच्या नशेतील संवाद अगदी खरेखुरे वाटले. याशिवाय जोशी (प्रा. सुनिल कात्रे), मोहिते (आकाश मुनफन) यांनीही आपापले पात्र पार पाडले. देसाईची भूमिका राजकुमार मोरे यांनी साकारली. राजमाने हे पात्र सागर अधापुरे यांनी रंगवले. अस्सल ज्येष्ठ कलाकार असे त्यांचे व्यक्तिमत्व वाटले. सलग असलेले संवाद त्यांनी बिनदिक्कत सादर केले. शहांची पत्नी जागृती पाटील यांनी रंगमंचावर आणली. यशस्वी निर्मात्याच्या पत्नीच्या चेहर्‍यावरील रूबाब त्यांनी योग्यपणे दाखविला. राधिका हे पात्र आकांक्षा शिंदे यांनी उभे केले. अभिजीतबरोबरच्या प्रसंगात त्यांच्या चेहर्‍यावरील चिंता खरीखुरी वाटली. संवादातील चढउतार उत्तम जमले. बल्लाळला कल्पेश शिंदे यांनी निभावले.

अभिजीत हे पात्र गणेश देशपांडे यांनी वठवले. एआयमुळे होणार्‍या नुकसानीची चिंता त्यांनी योग्यपणे दाखविली. रागीट भाव अतिशय नैसर्गिक वाटले. संवादातील एका शब्दात ते अडखळले. शिंदेंचे पात्र दीपक तुपेरे यांनी समजदारपणे केले. दीपकचे पात्र ओंकार बोथेकर यांच्याकडे होते. सुहासच्या आत्महत्येचा प्रसंग सांगताना ते कमालीचे भावूक झाले होते. पहिल्या प्रसंगांत कर्ण (सुनील लांबदाडे), कृष्ण (शिवाजी रणसिंग), अर्जून (गणेश पवार) या पात्रांनी आपापली छोटी भूमिका योग्यपणे सांभाळली. तसेच अँकर असलेल्या पायल कोरके, सायली ढमाळ, अंजना पंडित व कॅमेरामन असलेला सचिन साळवी यांनी आपापली भूमिका पूर्ण केली. याशिवाय सुरेखा घोलप, रियाज शेख, प्रीती शिंदे, अनुज पवार, विवेक कसबे, संस्कृती शिंदे, सार्थक शिंगणे, नामदेव फाटे, संकेत शिंदे, सई काळे, अक्षय कुरकुटे, सुयश कुलकर्णी आदींनीही नाटकात काम केले.

नेपथ्याची जबाबदारी दीपक ओहोळ, सुधीर देशपांडे यांच्याकडे होती. प्रकाश योजना विक्रम गवांदे, ओम वाळके यांनी केली. पहिल्या प्रसंगांतील रंगीबेरंगी लाईट्स प्रभावी वाटले. स्पॉटही उत्तम दिले. समुद्राच्या लाटाही एका प्रसंगांत छान वाटल्या. पार्श्वसंगीत कल्पेश शिंदे, गीता शिंपी यांनी उत्तमपणे दिले. भावूक, गंभीर प्रसंगात दिलेला संगीत, तसेच समुद्र किनार्‍यावर लाटांचा आवाज समर्पक वाटला. रंगभूषा चंद्रकांत सैंदाणे यांनी केली. महाभारतातील पात्रं हुबेहूब वाटले. शहा, राधिका, अभिजीत, राजमाने यांची रंगभूषा उठावदार वाटली. वेशभूषा कुंदा शिंदे यांनी केली. अर्जुन, कृष्ण, कर्ण, शहा, राधिका, मंत्री, पाटील, अभिजीत, पार्टीतील अँकर यांची वेशभूषा समर्पक होती. एआयच्या फायद्या-तोट्यांवर आधारित असणार्‍या नाटकाने दुसर्‍या अंकातील चर्चेने प्रेक्षकांना बरीच माहिती दिली. एआयच्या प्रवाहात कलाकारांनी कसे टिकायचे याचाही सल्ला नाटकाने दिला.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : ट्रॅव्हल्स व्यावसायिकाची पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik आईसोबत (Mother) झालेल्या आर्थिक वादाच्या रागातून एका ट्रॅव्हल्स व्यावसायिकाने घराच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना पंचवटी...