Sunday, June 14, 2026
Homeनगरराज्य नाट्य स्पर्धा : उत्सूकता वाढवणारी गूढ कथा ‘फार्म हाऊस’

राज्य नाट्य स्पर्धा : उत्सूकता वाढवणारी गूढ कथा ‘फार्म हाऊस’

संदीप जाधव | अहिल्यानगर

रहस्यमय कथा सर्वांनाच आवडतात. यावर आधारित नाटकांचे सादरीकरण करणे तसे अवघड काम. त्यातील घटनांच्या बारकाव्यांकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागते. राज्य नाट्य स्पर्धेत बुधवारी रंगमंचावर अशीच एक गूढ कथा दर्शविणारं ‘फार्म हाऊस’ हे नाटक सादर झालं. नाटकाने प्रेक्षकांची उत्सूकता कमालीची ताणली. कलाकारांचा परिपक्व अभिनय व तांत्रिक बाजू यामुळे नाटकाने चांगलीच रंगत आणली.

- Advertisement -

अहिल्यानगरच्या रंगोदय प्रतिष्ठानने मंगळवारी (25 नोव्हेंबर) सादर केलेल्या या नाटकाचे लेखन सागर खिस्ती यांनी केले. गूढ व सहस्मय नाटकाचे लेखन करून त्यांनी एक वेगळा चांगला प्रयत्न या वेळी केला. दरवर्षी प्रेक्षकांचे जेमतेम समाधान करणार्‍या त्यांच्या नाटकाने यंदा मात्र कमालीची उत्सूकता ताणली. अनेक प्रसंग दणदणीत झाले. नाटकाचा शेवट प्रभावी झाला असला तरी अनेक प्रेक्षकांच्या मनात मात्र काहिसा संभ्रम निर्माण झाला. दिग्दर्शनाची जबाबदारी ज्योती खिस्ती यांनी पार पाडली. नेपथ्य, संगीत व कलाकारांचा भेदक अभिनय यामुळे नाटक रंगतदारपणे पुढे पुढे सरकत होते. नाटकाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले.

मयांक सरतापे, त्यांची पत्नी विशाखा व मुलगी अबोलीसह सुट्टी घालविण्यासाठी मित्र सौरभ जहागीरदारच्या मालकीच्या फार्म हाऊसवर येतात. नाटकाच्या सर्व घडामोडी तेथेच घडतात. मल्हारीकाका फार्म हाऊसचा सेवक मयांक यांची खातरदारी करतो. मात्र, त्याच्या वेगवेगळ्या वाक्यांतून तो मयांकला सावध राहण्याबाबतचा सल्ला देतो. तसेच फार्म हाऊसचा माळीकाकाही तीच री ओढतो. यामुळे मयांक संभ्रमात पडतो, मात्र नंतर त्याकडे लक्ष देत नाही. वाचन करताना पुस्तकातील पात्रांचा प्रसंग रंगमंचावर दाखवला जातो. अर्थात त्याचा काहीतरी संबंध नाटकातील गूढतेशी जोडण्याचा प्रयत्न लेखकाचा असावा.

नंतरच्या एका प्रसंगात मोहन विभुते या पात्राची एन्ट्री होते. निगरगट्ट व कावेबाज वाटणार्‍या मोहनच्या मनात वेगळेच डावपेच शिजत असतात. दणदणीत संगीताच्या साथीने नाटकातील गूढता गडद होत जाते. आता पुढे काय होणार याबाबतची उत्सुकता लागून राहते. मयांकच्या मुलीला (अबोली) जादूचे खेळ दाखवण्याच्या नादात मोहन संमोहीत करतो. मग ती पूर्णपणे मोहनच्या ताब्यात जाते. तो म्हणेल तसंच ती करते. तिची अवस्था पाहून विशाल-विशाखा हतबल होतात. अर्थात त्याचे हे कृत्य एका व्यवहारासाठी असते. ते फार्म हाऊस विकत घेण्याचा प्रस्ताव मूळ मालक जहागीरदार नाकारत असतो. म्हणून फार्म हाऊसमध्ये येणार्‍या पर्यटकांना तो अशाच प्रकारे हाकलून लावतो. मात्र, हा डाव त्याच्यावरच उलटतो. अबोली त्याचा गळा आवळून खून करते. मग त्याचा ड्रायव्हर मोहनच्या आधीच्या कृत्याबाबत मयांकला माहिती देतो.

दरम्यानच्या काळात मोहनला मारण्यासाठी त्याच्या मागावर असलेला जहागीरदार मल्हारीकाका व माळीकाका यांच्यासमवेत तेथे येतो. मोहनचा खून झाल्याचे समजल्यावर भलताच खूष होतो. मोहनच्या मृतदेहाचा मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी बाहेर नेला जातो. मोठे संकट टळल्याचा आनंद सर्वांच्याच चेहर्‍यावर दिसत असतानाच दाराची बेल वाजते आणि मोहन पुन्हा फार्म हाऊसमध्ये येतो. मोहन परत कसा आला आणि आता काय होणार, असे वाटत असतानाच नाटकावर पडदा पडतो. नाटकाने चांगल्या टाळ्या घेतल्या. फार्म हाऊसची गूढता उत्तरोत्तर वाढत गेली. कलाकारांनी मन लावून अभिनय केला. तांत्रिक बाजू उजवी होती. पुस्तकातील प्रसंग रंगमंचावर मूकपद्धतीने दर्शविले गेले. मात्र, त्याचा नाटकाशी संबंध जोडता आला नाही. मोहनच्या संमोहनात अडकलेल्या अवस्थेत असलेली अबोली त्याचा खून कसा करते, हेही समजले नाही. कारण नंतर तिला काहीच आठवण नाही. मरण पावला असे समजूनही मोहन पुन्हा जिवंत कसा, याबाबतही प्रेक्षकांत संभ्रम निर्माण झाला. असे असले तरी नाटकातील अनेक प्रसंगांनी चांगलीच रंगत आणली. उत्सूकता शिगेला पोहोचवण्यात दिग्दर्शिका ज्योती खिस्ती यशस्वी झाल्या.

मयांकची भूमिका विशाल कुटे यांनी उभी केली. स्पर्धेत पदार्पणातच त्यांनी आपल्या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला. विविध हावभाव त्यांना उत्तम जमले. आवाजातील चढउतार आणि डोळ्यांचे भावही अनेक प्रसंगात समर्पक वाटले. मुलीची काळजी दर्शविणारा त्यांचा अभिनय चांगलाच फुलला. एका प्रसंगात मात्र त्यांचा चुकून प्रवेश झाला! विशाखा ही भूमिका आश्विनी वसगडेकर यांनी निभावली. भेदरलेले हावभाव चांगले जमले असले तरी अबोलीच्या संमोहनावस्थेच्या वर्तनावर आईची काळजी दर्शविण्यात त्या कमी पडल्या. अबोलीला समृद्धी खिस्ती हिने रंगवले. तिचा अभिनय नाटकात सर्वांत जास्त लक्षवेधी ठरला. विविध गंभीर भाव दर्शवितानाच तिने नृत्यही उत्तम केले. अबोलीचे पात्र उठावदार झाले. तिने अभिनयाकडे चांगले लक्ष दिल्याचे दिसले. जय खुडे यांनी सौरभ जहागीरदार फार्म हाऊसवर आणला. बेरकी स्वभाव छान दर्शविला, मात्र संवादाकडे आणखी लक्ष द्यायला हवे होते. माळीकाकांची भूमिका तुकाराम पुरी यांनी केली. मयांकशी त्यांच्या संवादाला हावभावांची चांगली साथ मिळाली. छोटेसे पात्र त्यांनी पूर्ण केले.

मल्हारीकाकाची भूमिका जालिंदर शिंदे यांनी वठवली. चिंतेचे हावभाव त्यांनी चपलखपणे दर्शविले. सकारात्मक देहबोली व आत्मविश्वासू गावठी संवाद यांच्या युुतीने त्यांनी उत्तम अभिनय केला. ड्रायव्हरचे पात्र निलेश मेढे यांनी केले. त्यांच्या पहिल्याच प्रसंगात ड्रायव्हर चुकून आधीच रंगमंचावर आला! मात्र, चूक कळताच परत मागे गेला. नंतर मात्र स्पष्ट संवाद करून आपली भूमिका त्यांनी व्यवस्थित पार नेली. एका प्रसंगात त्यांच्या संवादाने चांगलीच खसखस पिकविली. मोहन विभुते हे पात्र सागर खिस्ती यांनी बेरकीपणे उभे केले. कपटी हावभाव, विकृत हास्य यांच्या जोरावर आपल्या वाट्याला आलेली खलनायकी भूमिका त्यांनी उत्कृष्टपणे केली. देहबोलीही कमालीची सकारात्मक वाटली. आवाजातील चढउतारही चांगले. एखाद्या सिनेमातील खलनायकाप्रमाणेच त्यांनी नाटकात एन्ट्री केली. पुस्तकातील रेवती व अथर्व हे पात्र अनुक्रमे तुलसी पुरी व हेमंत रोहिडा यांनी चांगल्यापैकी केली. संवाद नसूनही मूकपणे आपापले पात्र त्यांनी रंगवले.

नेपथ्य अंजना मोरे यांचे होते. उंची सोफा, पुस्तकांचे कपाट व खिडकीतील दृश्य समर्पक वाटले. प्रकाश योजना पूजा लिमकर यांच्याकडे होती. पुस्तकातील प्रसंगांवेळी वापरलेले पिवळे लाईट्स प्रभावी वाटले. तसेच गूढता दर्शविण्यासाठी विविध रंगीत लाईट्सही भारीच. अबोलीच्या नृत्यावेळीही दिलेला स्पॉट उत्तम वाटला. नाटकाच्या प्रसंगांची गूढता वाढविण्यास कारणीभूत असलेले संगीत शैलेश देशमुख यांनी दिले. त्यांनी दिलेल्या रहस्यमयी संगीतामुळे प्रसंग गूढतेकडे सरकत होते. तांत्रिक बाबींमध्ये त्यांची जबाबदारी सर्वांत उजवी ठरली. रंगभूषा व वेशभूषा नलिनी पुरी यांची होती. विशाल, अबोली, मोहन, ड्रायव्हर, माळीकाका यांची रंगभूषा समर्पक वाटले. मल्हारीकाकांची केस पांढरे दाखवता आले असते. वेशभूषा मात्र समर्पक वाटली.

ज्योती खिस्ती यांनी चांगला प्रयत्न केला. कलाकारांची साथही त्यांना चांगली मिळाली. तांत्रिक बाजूही उत्तम होती. अबोलीची भूमिका सर्वांत जास्त प्रभावी वाटली. नाटकाच्या शेवटाने अनेक प्रेक्षकांना पेचात पाडले. मात्र, अनेक प्रसंगांतील रहस्यमतेने नाटकाची गूढता उंचीवर नेऊन ठेवली होती.

ताज्या बातम्या

Solapur News : भीषण अपघात! पिकअप विहिरीत कोसळून 14 भाविकांचा जागीच...

0
सोलापूर । Solapur सोलापूरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देवदर्शनाचा आनंद घेऊन आनंदाने घरी परतणाऱ्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर काळाने घाला घातला आहे....