Thursday, May 7, 2026
Homeनगरराज्य नाट्य स्पर्धा : महिला-मुलींची असुरक्षितता आणि भ्रष्ट व्यवस्थेवर ‘पेन’ने टाकला प्रकाश

राज्य नाट्य स्पर्धा : महिला-मुलींची असुरक्षितता आणि भ्रष्ट व्यवस्थेवर ‘पेन’ने टाकला प्रकाश

संदीप जाधव | अहिल्यानगर

महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. पुरूषी विकृतीने लहान मुलींनाही सोडलेले नाही. महिला-मुलींच्या बळींची वाढती संख्याही चिंताजनक आहे. सध्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पालकांना सतावतोय. आपली मुलगी शाळेत तरी सुरक्षित राहील का याबाबत पालकांना साशंकता वाटते. कारण मुलींवरील अन्याय-अत्याचाराच्या अनेक घटना शाळांमध्येही घडल्या आहेत. अशाच एका गरीब घरातल्या चिमुकल्या विद्यार्थिनीच्या खुनाचा तपास दर्शविणारे ‘पेन’ हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत बुधवारी (3 डिसेंबर) पहायला मिळाले.

- Advertisement -

संगमनेर येथील रंगकर्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने सादर केलेल्या या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन अंतून घोडके यांनी केले. मुलींवरील अत्याचारानंतर तिला न्यायालयाकडून न्याय मिळत नाही, फक्त मिळतो तो निकाल… हा गंभीर आशय नाटकाने दिला. मात्र, नाटक सादरीकरणात अनेक चुका झाल्या. व्यवस्थित न जुळलेले प्रसंग व संवादातील विसंगती टाळली असती तर नाटक प्रभावी झाले असते. पहिल्याच प्रसंगात रेल्वेस्टेशनच्या परिसराचे दर्शन होते. स्टेशनच्या बाजूला पाईपमध्ये पुंजा-हिरा व त्यांची रत्ना ही मुलगी राहत असते. मोलमजुरी करून ते उदरनिर्वाह चालवितात. कादीर हा स्टेशनवर पेनचे महत्त्व सांगून त्यांची विक्री करत असतो. तो जुगारी व व्यसनी. त्याची गट्टी रघु व लाला या दोन्ही जुगार्‍यांशी असते.

रत्ना शाळेत न आल्याने तिच्याबाबत चौकशी करण्यासाठी एके दिवशी शिक्षक येतात. जाताना तिला एक महागडा पेन भेट देऊन जातात. रत्ना कुठल्यातरी अनामिक भितीपोटी शाळेत जाण्यास टाळते. नंतर रत्नाचा खून होतो. पोलिस तपास सुरू होतो. तपासासाठी पोलिस स्टेशनमध्ये रत्नाच्या आईला म्हणजेच हिराला बोलावले जाते. तिच्या जबाबात मास्तर, ठेकेदार राऊत व आजूबाजूच्या अन्य व्यक्तींचा उल्लेख होतो. या मिळालेल्या माहितीवरून इन्स्पेक्टर प्रज्ञा तपासाला गती देण्याचा प्रयत्न करतात. पोलिसांच्या धरपकडीत कादीर हाती लागतो. त्याच्या अंगावरील महागड्या कपड्यांबाबत विचारणा केल्यावर ते कपडे लालाने दिल्याचे कादीर पोलिसांना सांगतो. नंतर मास्तरला बोलावले जाते. मास्तर व्यवस्थेवर भाष्य करतो, त्याच्या चर्चेत इन्स्पेक्टरही सूर मिळवितात. ठेकेदाराचीही चौकशी होते. पोलिस स्टेशनमध्ये आलेल्या पत्रकाराला उद्देशून पत्रकारितेतील अनिष्ट प्रवृत्तींवर मास्तर सडकून टीका करतो. नंतर संस्थाचालक शेट्टीचीही चौकशी होते.

रत्नाच्या खुनाच्या तपासात घटनास्थळी सापडलेला पेन महत्त्वाचा दुवा ठरतो. हा पेन मास्तरचाच असतो. संशयित आरोपी लाला घटनाक्रम सांगतो. खून करून काटवनातून बाहेर आलेल्या मास्तरला पाहिल्याचे तो सांगतो. कुणाला काही न सांगण्याबद्दल पैसे देतो. खुनाचा भंडाफोड झाल्यानंतर मास्तर खुनाची कबुली देतो. स्वतः खून करूनही पुन्हा स्त्रियांच्या अत्याचारावर व सरकारी व्यवस्थेवर बोलतो! शेवटी पोलिस स्टेशनमध्येच इन्स्पेक्टर त्याला गोळी घालून संपवते आणि नाटकही संपते. नाटकाने चांगला संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही प्रसंगांत आलेला विस्कळितपणा व पात्रांचा कमी पडलेला सराव यामुळे उठावदार झाले नाही. खुनाचा तपास चालू असताना लांबलेले संवाद खटकले. काही पात्रांनी मात्र आपापली भूमिका चांगलीच रंगवली. त्यामुळे काही प्रसंग परिणामकारक झाले. ज्वलंत विषयावर नाटकाने नेमकेपणाने बोट ठेवले.

हिरा हे पात्र राधा चव्हाण यांनी साकारले. रागीट हावभावांच्या आधारे केलेले संवाद त्यांनी उत्कृष्टपणे दर्शविले. मुलीच्या खुनाच्या दुःखात बुडालेल्या आईचा आक्रोश अगदी नैसर्गिक वाटला. नाटकात त्यांचे पात्र लक्षवेधी ठरले. रत्ना या बाल कलाकाराची भूमिका आराध्य मंडलिकने व्यवस्थित पार पाडली. संवादही एकदम स्पष्ट होते. पुंजा हे पात्र विराज यादव यांनी निभावले. कादीरची भूमिका कार्तिक जोशी यांनी आत्मविश्वासाने वठवली. पेनची विक्री करतानाचे हावभाव व मवाली भाषेतील संवाद त्यांना छान जमले. राऊत मामाला मयूर जगताप यांनी, तर रघूला संकेत तायडे यांनी रंगमंचावर आणले. आपापल्या परीने त्यांनी भूमिका पूर्ण केली. लाला हे पात्र माजीद खान यांनी बेरकीपणाने केले. त्यांचे संवादही अस्खलीत होते. निगरगट्ट व्यक्तीप्रमाणे त्यांचा रंगमंचावरील वावर साजेसा होता.

पंडित मास्तरची भूमिका दिग्दर्शक अंतून घोडके यांनी केली. विविध प्रसंगांतील त्यांचे हावभाव योग्य वाटले. संवादांतून तळमळ दाखविण्याचा त्यांनी चांगला प्रयत्न केला. एका संवादात मात्र ते अडखळले. आवाजातील चढउतार मात्र उत्तम होता. नाट्यातील देवींची भूमिकेत असलेल्या प्रिती नवले व सिद्धी कोटकर यांनी आपापले संवाद साधून नाटकात सहभाग नोंदविला. हवालदार बालोटे प्रशांत नांगरे यांनी साकारले. खून झाल्यानंतरच्या प्रसंगांत रत्नाच्या घरी ते बुटाविनाच आले! पोलिस स्टेशनमधील संवाद मात्र चांगले वाटले. इन्स्पेक्टर प्रज्ञाला सुनिता कोडे यांनी पोलिस स्टेशनमध्ये आणले. हुबेहूब अधिकारी शोभाव्यात असे त्यांचे व्यक्तिमत्व वाटले. आरोपीला मारण्याचा अभिनय त्यांनी चांगला केला. पत्रकाराच्या वेशात विकास वाव्हळ आले. त्यांच्या संवादात आत्मविश्वास दिसला नाही. हावभावांकडे आणि आवाजाकडे त्यांनी लक्ष द्यायला हवे होते. शेट्टी आण्णाला दीपक मंडलिक यांनी उभे केले. चेहर्‍यावरील गर्विष्ट रूबाबात त्यांनी केेलेले संवाद यथायोग्य वाटले. देहबोलीही सकारात्मक वाटली.

नेपथ्य, केशभूषा, वेशभूषा या सर्व जबाबदार्‍या तृप्ती घोडके यांनी सांभाळल्या. रेल्वे स्टेशनजवळील पाईप, पोलिस स्टेशनचे नेपथ्य समर्पक वाटले. रत्ना, कादीर, लाला, पोलिस इन्स्पेक्टर आणि देवींच्या भूमिकेतील पात्रांचा पेहराव व्यवस्थित वाटला. प्रकाश योजना विशाल कदम यांच्याकडे होती. विविध प्रसंगांत त्यांनी योग्य स्पॉट दिले. देवींच्या प्रसंगावेळी मात्र गडबड झाली. मध्येच लाईट लागली! संगीत योजना कल्पेश शिंदे यांच्याकडे होती. प्रसंगांत गंभीरता आणणारे संगीत त्यांनी दिले. रेल्वेचा आवाजही उत्तम वाटला. रंगभूषा ज्योती कुलथे यांनी केली. देवी, लाला, इन्स्पेक्टर, हिरा यांची रंगभूषा उत्तम होती.

नाटकात रत्नाचा खुनी नेमका कोण हे प्रेक्षकांनी लगेचच ओळखले. त्यात गूढता दाखवायला हवी होती. तसेच खुनाची कबुली दिलेला मास्तरच संवादातून नैतिकता व मूल्यांबाबत बोलतो हे अगदीच विसंगत वाटले. मात्र, नाटकाने काही चांगले संदेशही दिले. मुली शाळेतसुद्धा सुरक्षित राहू शकत नाहीत, हा मुद्दा या नाटकाने अधोरेखित केला. तसेच पीडित महिलांना लवकर न्याय मिळत नाही, मिळतो तो केवळ निकाल, हे वाक्य टाळ्या घेऊन गेले. व्यवस्थेतील भ्रष्ट कारभारावर नाटकाने योग्य भाष्य केले. गुन्हेगाराचा गोळ्या मारून झालेला शेवट प्रेक्षकांना भावला.

ताज्या बातम्या

Crime News : बेकायदेशीर ‘कॅफे’वर पोलिसांचा छापा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरातील सावेडी परिसरात अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील झेड.के. बॉलीवुड कॅफे येथे बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या कथित ‘कॅफे’वर तोफखाना पोलीस ठाण्याच्या पथकाने मंगळवारी (5 मे) सायंकाळी...