संदीप जाधव | अहिल्यानगर
आजकालची राजकीय व्यवस्था कमालीची गढूळ झाली आहे. सामान्य नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. निवडणुकीत जिंकण्यासाठी स्फोटक व विध्वंसक घटनांच्या कुबड्यांचा आधार घेतला जातो. इतिहास विसरणे योग्य नाहीच. मात्र या भुतकाळातील घटनांचा वापर जखमांवरील खपल्या काढण्यासाठी नाही तर भविष्यातील चुका टाळण्यासाठी व्हायला हवा, अन्यथा देश विनाशाकडे जाईल. त्यात सामान्य जनतेची फरपट होईल, असा सणसणीत संदेश देणारं ‘उत्खनन’ हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत शुक्रवारी (21 नोव्हेंबर) रंगमंचावर सादर झाले. राजकीय व्यवस्था, शिक्षण, ऐतिहासिक संदर्भावर नेमकेपणाने बोट ठेवून विषय स्पष्टपणे मांडून नाटकाने प्रेक्षकांची वाहवा मिळविली.
शेवगाव येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या प्रवरा थिएटर्स व एफ. के. क्रिएटिव्ह क्रिएशन्सने सादर केलेल्या उत्खनन या नाटकाचे लेखक इरफान मुजावर आहेत. फिरोझ काझी यांनी त्याचे दिग्दर्शन केले. राजकीय नेते व कार्यकर्त्यांच्या मानसिकता आणि बरबरटलेली व्यवस्था यांच्यावर सरळ भाष्य करून त्याचे उत्कृष्टपणे सादरीकरण करण्यात दिग्दर्शक प्रा. फिरोझ काझी यशस्वी झाले. विविध प्रसंगांत नाटकाने चांगला संदेश दिला. इतिहासाचे उत्खनन करू नका, जर करायचेच असेल तर त्यातील घटनांचा बोध घेऊन भविष्यातील चुका सुधारा. त्याचा गैरवापर देशाला घातक ठरेल, असा इशारावजा सल्ला नाटकाने अधोरेखित केला. कलाकारांचा आत्मविश्वासू अभिनय, तांत्रिक बाजूंची योग्य साथ यामुळे नाटक खुलले.
पहिल्या अंकाच्या सुरुवातीलच जुनाट साहित्य असलेल्या भांडाराचे दर्शन होते. जातीयवाद, भेदभाव, संविधान, गोध्रा कांड, इंदिरा गांधी हत्याकांड, राजीव गांधी हत्या, धर्मवाद, आरक्षण, धार्मिक प्रश्न आदी फलक असलेल्या वस्तू तेथे दिसतात. अर्थात ते असते निवडणुकीसाठी हव्या असलेल्या स्फोटक मुद्द्यांचे ऐतिहासिक भांडार! या भांडारात एक राजकीय कार्यकर्ता येतो. त्याला निवडणुकीसाठी मुद्दे हवे असतात.
मात्र, त्या नवख्या कार्यकर्त्याला हवे असलेले साहित्य निष्फळ असल्याचे भांडाराचा संचालक सांगतो. झोपडपट्टी विकास, रस्ते, पाणी, वीज या प्रश्नांवर निवडणूक लढविण्यापेक्षा राजकीय लोक स्फोटक व विध्वंसक घटना उगाळून त्याचा वापर करतात, या राजकीय वृत्तीवर प्रखरपणे भाष्य केले जाते. भांडारात असलेल्या अंधारी खोली याबाबत कार्यकर्ता विचारतो तेव्हा त्याला ते इतिहासाचे गर्भगृह असल्याचे समजते. तेथे उत्खनन करावे लागते, मगच ऐतिहासिक गोष्टींचे दर्शन होते. तेथे उत्खनन करून कार्यकर्त्याला देशाची फाळणी, आणीबाणी, खालिस्तानी कारवाई, इंदिरा गांधी हत्या, कारसेवा, गोध्राकांड, मुंबई बॉम्बस्फोट आदी घटना दिसतात. या घटना दर्शविण्यासाठी नाटक फ्लॅशबॅकमध्ये जाते. प्रत्येक प्रसंगांत सामान्य माणसाची होणारी अवस्था बिकट होते. अशा ऐतिहासिक घटनांच्या संदर्भाचा वापर राजकीय व्यक्ती स्वार्थासाठी करतात. सत्तेपुढे ते कोणत्याही थराला जातात. मानसिक गुलामगिरी वाढली की देश विनाशाकडे जातो हा विचार समजण्यासाठी ‘जालियनवाला बाग हत्याकांडा’चे उदाहरण नाटकात दिले आहे.
जनरल डायरच्या आदेशावरून सैनिक असलेल्या भारतीयांनीच भारतीयांवर गोळ्या झाडल्या. ते सैनिक मानसिक गुलाम असतात, असेही नाटकातील एका प्रसंगाने सांगितले. सामान्य माणसांकडे कुणाचेच लक्ष नसते. त्याची कायम बोळवणच होते. त्यांचा वापर केवळ मतांसाठीच होतो. नेत्याच्या दवाबाखाली चुकीचे कृत्य करणारे कार्यर्त्यांची अवस्थाही नाटकात दाखविण्यात आली आहे. शेवटच्या प्रसंगांत डोळे उघडलेल्या कार्यकर्त्याला भांडारचा संचालक एक कोरे पुस्तक देऊन त्यात नवीन सकारात्मक विचार मांडायला सांगतो. सामान्य माणूस आणि कार्यकर्ता जातो, मग पुन्हा नवा कार्यकर्ता मुद्दे घ्यायला तेथे येतो आणि हे चक्र पुन्हा सुरू होते अशा दृश्याने नाटक संपते. बरबरटलेल्या राजकीय स्थिती दर्शविणारी नाटकाची संहिता दमदार होती. त्याला दिग्दर्शक फिरोज काझी यांनी उत्तमपणे रंगमंचावर उतरविले. तीनच पात्र असूनही नाटक रेंगाळले नाही. नाटकाने दिलेला स्पष्ट संदेश प्रेक्षकांना भावला पण काही प्रश्नांचा विचारही करायला लावले.
मुख्य नायकाच्या भूमिकेत असलेल्या प्रा. फिरोझ काझी यांच्याकडे सर्वांत जास्त जबाबदारी होती. आत्मविश्वासू अभिनय आणि विविध हावभाव यांना त्यांच्या सकारात्मक देहबोलीची साथ मिळाली. चिंतातूर, व्याकूळ व निरग्रही हावभावांनी त्यांचे पात्र खुलवले. पाठांतरही चांगले होते. दोन-तीन वेळा शब्दांत ते अडखळले. मात्र, विविध प्रसंगांत त्यांनी केलेला अभिनय लाजवाबच होता. आवाजातील चढ-उतारही उत्तम होते. प्रा. साजेद पटेल यांनी राजकीय कार्यकर्त्याची भूमिका व्यवस्थित वठवली. अभिनयाकडे त्यांनी चांगले लक्ष दिले. संवादही चांगले रंगवले. पण दोनदा ते अडखळले. उत्खनन करतानाचे हावभाव विशेष आवडले. दादा नवघरे यांनी सामान्य माणसाला रंगमंचावर आणले. त्यांनीही आपल्या भूमिकेला न्याय दिला. मार्मिक भाष्य करून त्यांनी प्रेक्षकांना विचारात पाडले. सर्वांत कमी संवाद त्यांच्या वाट्याला आले. मात्र पात्राला त्यांनी गंभीरपणे उभे केले.
नाटकाचे सूत्रधार प्राचार्य डॉ. ओंकार रसाळ होते, तर प्रवरा शैक्षणिक संकुलाच्या सहसचिव मोनिकाताई सावंत यांची निर्मिती होती. इतिहास भांडाराचे नेपथ्य उत्तम वाटले. ही जबाबदारी प्राचार्य डॉ. ओंकार रसाळ, प्रा. अजित भालसिंग, प्रा. डॉ. सुरेश नजन, डॉ. राहुल पांडव, प्रा. राहुल खरात, प्रा. रामचंद्र छडीदार यांच्याकडे होती. नाटकातील प्रसंग उठावदार करणारी प्रकाश योजना प्रा. वाल्मिक जाधव व विनोद राठोड यांनी सांभाळली. विविध स्पॉट त्यांनी योग्यपणे दिले. रक्तरंजित प्रसंगावेळी लाल लाईट्सचा कल्पकतेने वापर केला. मात्र, एक-दोन प्रसंगांत लाईटची गफलत झाली. मात्र, प्रसंग प्रभावी करण्यात प्रकाश योजना सहाय्यभूत ठरली. नाटकात अनेक प्रसंगांत संगीताचा वापर नेमकेपणाने करण्यात आला. नेहरू, इंदिरा गांधी यांची भाषणे, तसेच यथायोग्य पार्श्वसंगीत आवडले. ही जबाबदारी डॉ. तुकाराम देवकर व प्रा. पांडुरंग शिनगारे यांनी सांभाळली. रंगभूषा प्रा. केशव ससे व प्रा. मन्मथ क्षीरसागर यांच्याकडे होती. सर्वच पात्रांची रंगभूषा उत्तम होती. वेशभूषा प्रा. सुमित पुलाटे, प्रा. चैतन्य गंगावणे यांनी केली. कार्यकर्त्याच्या टोपी, मुस्लीम पेहराव, तसेच सामान्य माणसाची वेशभूषाही समर्पक वाटली. गौरव क्षीरसागर, विजय गाढे, तृणाल दौंड, अमन पठाण, त्रिपुल शिदे, अजिंक्य भुजबळ यांचेही नाटकासाठी सहकार्य लाभले.
राजकीय व्यवस्थेवर थेट भाष्य करणारे हे नाटक दिग्दर्शक प्रा. फिरोझ काझी यांनी रंगमंचावर ठसठशीतपणे उतरवले. काही तांत्रिक चुका झाल्या असल्या तरी नाटकाचा संदेश प्रेक्षकांपर्यंत स्पष्टपणे पोहोचला. दिग्दर्शनाबरोबरच मुख्य नायकाची भूमिका काझी यांनी व्यवस्थित पेलली. राजकीय वृत्तीवर आधारित असणार्या या नाटकाने अनेक विचारही मांडले, ते प्रेक्षकांना भावले.




