मुंबई | Mumbai
राज्यातील महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम सुरू होण्याआधीच खळबळ उडाली आहे. कारण बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांना धक्का बसला आहे. निवडणुकांसाठी मतदान करण्यास अवघे १२ दिवस शिल्लक आहेत आणि निकाल जाहीर व्हायला १३ दिवस बाकी आहेत. मात्र, या निवडणुकांआधीच राज्यभरात उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. मात्र मुंबईसह राज्यातील बिनविरोध निवडणुकांची चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
विरोधी उमेदवारांवर दबाव, आमिष किंवा जबरदस्ती करून नामनिर्देशन मागे घेण्यास भाग पाडले गेले का, याची तपासणी करण्यात येणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडींची विजय घोषणा केली जाणार नाही, अशी माहितीही राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांमध्ये आतापर्यंत ६७ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. म्हणजे काही ठिकाणी मतदारांनी मतदानही केले नाही आणि उमेदवार थेट विजयी झाले आहेत. बिनविरोध निवडणुका का होत आहेत, त्यामागे दबाव, धमकी किंवा आमिषांचा वापर झाला का, या प्रश्नांची उत्तर आता शोधली जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितले की, चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही बिनविरोध उमेदवाराची अधिकृत विजयाची घोषणा केली जाणार नाही. विरोधी उमेदवारांना जबरदस्तीने किंवा दबावाखाली नामनिर्देशन मागे घ्यायला भाग पाडले गेले का, याची सखोल तपासणी केली जाणार आहे.
केडीएमसीत भाजपचे १४ व शिवसेना शिंदे गटाचे ६ उमेदवार, तसेच पिंपरी-चिंचवड, जळगाव, छत्रपती संभाजीनगर येथे किमान एक भाजपा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. कुलाबातील तीन प्रभागांत काँग्रेस, जनता दल (एस) व आपचे उमेदवारांनी दबावाखाली नामनिर्देशन न स्वीकारल्याचा आरोप केला असून या प्रकरणाचीही चौकशी होणार आहे. आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त व वॉर्ड ‘ए’ कार्यालयातील CCTV फुटेज तपासण्याचे निर्देश दिले आहेत. नियमभंग झाल्याचे आढळल्यास संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. मात्र, एकदा नामनिर्देशन मागे घेतल्यानंतर उमेदवारांना पुन्हा अर्ज दाखल करण्याची कोणतीही तरतूद नाही, हेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
२ जानेवारीनंतर म्हणजे नामनिर्देशन मागे घेण्याच्या अंतिम तारखेनंतर, संबंधित अधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून सविस्तर अहवाल मागवले जाणार आहेत. त्यानंतरच बिनविरोध निवडी खर्या आहेत की नाही, यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
एकुण बिनविरोध उमेदवार-६७
भाजपा – 45
शिवसेना शिंदे गट- 19
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट- 2
इतर- 1
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





