Friday, May 3, 2024
Homeनगरप्रत्येक शाळेत फुलणार राज्यफुल ताम्हण..!

प्रत्येक शाळेत फुलणार राज्यफुल ताम्हण..!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषद शिक्षण विभाग, जिल्हा निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्र, प्रियदर्शनी पब्लिक स्कुल, भिंगार व श्री.अम्मा भगवान फाउंडेशन, नगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राज्यफुल आपल्या दारी’ या जिल्हास्तरीय उपक्रमाचे नगर येथील शासकीय निवासगृह येथे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत राज्यफुल ताम्हण फुलविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

- Advertisement -

या उद्घाटन प्रसंगी प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक श्री.दिनकर टेमकर, शिक्षणाधिकारी रामदास हराळ रिमाकांत काठमोरे, उपशिक्षणाधिकारीअरूण धामणे, गटशिक्षणाधिकारी रवींद्र कापरे यांच्यासह जिल्हा निसर्गप्रेमी टिमचे जयराम सातपुते, संदीप राठोड, अमित गायकवाड, संदीप भालेराव, शिवकुमार वाघुंबरे, सचिन चव्हाण, राजेंद्र बोकंद, अजिंक्य सुपेकर आदी उपस्थित होते.

निसर्गप्रेमींच्या अथक प्रयत्नातून प्रियदर्शनी स्कुल येथे पहिल्या टप्प्यात सुमारे दीड हजार रोपांची यशस्वी निर्मिती केली गेली आहे. तसेच वर्षभर निगाही राखली गेली. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत राज्यफुल म्हणून मानचिन्ह असलेल्या ताम्हण या वृक्षाचे रोप मोफत दिले जाणार आहे,

अशी माहिती निसर्गअभ्यासक शिक्षक जयराम सातपुते यांनी दिली. ताम्हण पुष्पाबदल शास्त्रीय व पर्यावरणपुरक माहिती वनस्पती अभ्यासक अमित गायकवाड यांनी दिली तर उपस्थितांचे आभार संदीप राठोड यांनी मानले.

भारताची शान म्हणूनही ओळख

महाराष्ट्राचे राज्यफुल असलेले ताम्हण हे जारूल या नावानेही प्रसिद्ध असलेल्या या वृक्षाचे शास्त्रीय नाव लार्जेस्ट्रोमिया इंडिका असे असून विदेशी लोक या झाडाला भारताची शान असेही म्हणतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला याचे झाड पूर्णपणे निळसर गुलाबी रंगाच्या मनमोहक फुलांनी बहरून जाते. यावेळी राज्यफुलपाखरू ब्लू मॉरमॉनसह इतर अनेक सुंदर फुलपाखरे व मकरंदावर उपजीविका करणारे किटक व छोटे पक्षी याकडे आकर्षित होतात. पाने मोठी असल्यामुळे शिंपी, वटवट्यासारखे पक्षी यावर आपले घरटे बनवतात. म्हणूनच पर्यावरणातील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी हा वृक्ष महत्त्वाची भूमिका बजावतो. सुंदर दिसण्याबरोबरच याचे अनेक औषधी उपयोग देखील आहेत.

महाराष्ट्राचे राज्यफुल ताम्हण ही माहिती विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातूनच मिळत होती, पण या उपक्रमान्वये या वृक्षाच्या संवर्धनाबरोबरच प्रत्येक शाळेत या सुंदर फुलांचे सौदर्य अनुभवण्याची संधी सर्वांनाच मिळणार असल्याने नगर जिल्ह्याचा हा उपक्रम सर्व राज्यासाठीच अनुकरणीय व प्रेरणादायी असा आहे.

– दिनकर टेमकर, सहसंचालक, प्राथ. शिक्षण संचलनालय

- Advertisment -

ताज्या बातम्या