Friday, May 3, 2024
Homeनगरराज्यात पंधराशे शाळा लोकसहभागातून होणार आदर्श

राज्यात पंधराशे शाळा लोकसहभागातून होणार आदर्श

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

राज्य शासनाने मागील वर्षी राज्यात 488 शाळा आदर्श म्हणून घोषित केल्या आहेत. त्या धर्तीवर आणखी पंधराशे शाळा आदर्श करण्या संदर्भाने येत्या काही दिवसांत कार्यवाही सुरू होणार आहे. मात्र या शाळा लोकसहभागातून आदर्श करण्यावर भर देण्यात येणार आहे.

- Advertisement -

युती सरकारच्या काळात अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा निर्माण करण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर राज्यात महाआघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्याऐवजी आदर्श शाळा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे आदर्श शाळा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. त्याच धर्तीवर येत्या काळात आणखी पंधराशे शाळा आदर्श करण्यासंदर्भात राज्य स्तरावरून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मात्र या शाळा लोकसहभागातून आदर्श करण्यात येणार आहेत. यासंदर्भात प्रत्येक तालुक्यातून दोन निकष पात्र शाळांची माहिती अहमदनगर जिल्हा परिषदेच्यावतीने मागविण्यात आली आहे. सध्या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या 16 शाळा आदर्श आहेत. त्याच धर्तीवर यापुढे प्रत्येक तालुक्यातील दोन अशा आणखी 28 शाळा आदर्श उभ्या राहणार आहेत.

हे आहेत निकष-

राज्यात आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी शाळांची निवड करणे आवश्यक आहे. त्यासाठी निकषांची निश्चिती करण्यात आलेली आहे. त्यानुसार शाळेसाठी ची इमारत, अपेक्षित विद्यार्थी संख्या प्रमाण, वर्गखोल्या, अपंग मुलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, सर्व विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहे, हॅन्ड वॉश स्टेशन, पेयजल सुविधा, मध्यान्न भोजन स्वयंपाकगृह, भांडार कक्ष, शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक साहित्याचे उपयोजन, क्रीडांगण, खेळाचे साहित्य, जलव्यवस्थापन, शालेय इमारत इको फ्रेंडली, चाईल्ड फ्रेंडली, शालेय परिसरातील अंगणवाडी, प्रति विद्यार्थी पाच पुस्तके, संगणक कक्ष, व्हर्च्युअल क्लासरूम सुविधा, विद्युतीकरण, संरक्षक भिंत, आपत्ती व्यवस्थापन सुविधा, वायुवीजन सुविधा, सुरक्षित वाहतूक सुविधा, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी, स्कॉलरशिपचा निकाल, पात्र विद्यार्थी, राज्य गुणवत्ता यादीत विद्यार्थी इत्यादी माहिती अपेक्षित केली आहे. देशात अथवा देशांतर्गत शिक्षकांनी केलेली प्रशिक्षणे, प्रशिक्षणाचे नाव, सन 2021 मध्ये मिळालेला लोकसहभाग, लोकसहभागातून करून घेतलेल्या वस्तू, सी एस आर व त्यातून घेतलेल्या वस्तू, शासकीय योजनेतून लाभ भविष्यात, किती प्रमाणात सी.एस.आर मिळू शकेल व इतर बाबी उपाय असल्यास त्याची माहिती मागवण्यात आली आहे. त्याचबरोबर शाळेचा पट उपलब्ध करून द्यावा लागणार आहे.

आदर्श शाळांसाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तके-

राज्य सरकारने यावर्षी 488 शाळा आदर्श शाळा म्हणून घोषित केल्या आहेत. या शाळांसाठी नियमित अभ्यासक्रमाच्या संदर्भाने स्वतंत्र एकात्मिक पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे. त्यापाठ्य पुस्तकांच्या आधारे विद्यार्थ्यांचे अध्ययन व अध्यापनाची प्रक्रिया सुरू असणार आहे. या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषय हे एकाच पाठ्यपुस्तकाच्याद्वारे ठेवले जाणार आहेत. यासाठी वर्षभराचे एकूण चार भाग करण्यात आले असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र संकल्पना उपयोगात आणली आहे. त्याआधारे या विद्यार्थ्यांचे शिकणे अधिक परीणामकारक होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या