मुंबई | प्रतिनिधी Mumbai
डिजिटल, प्रमाणित आणि ऑनलाईन जल संपत्तीची माहिती प्राप्त करण्यासाठी नाशिक येथे राज्य जल माहिती केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सन २०२६-२७ या वर्षाचा अर्थसंकल्प मांडताना केली. या केंद्राच्या इमारतीसाठी ७१ कोटी २० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
नाशिक येथील रामकाल पथ विकास प्रकल्पाच्या अंतर्गत करण्यात येणारी विकास कामे प्रगती पथावर आहेत. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सन २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. या कुंभमेळ्यानिमित्त नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला देशातून आणि परदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक येतील. या कुंभमेळ्याच्या सुयोग्य आयोजनासाठी एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यात येत असून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.
आराखड्याच्या अंतर्गत गोदावरी नदी स्वच्छता, त्र्यंबकेश्वर येथे उपसा योजनेच्याद्वारे अमृतस्नान आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मलनिःसारण प्रकल्प, घाट सुधारणा आणि सुशोभीकरण आदी कामे प्रगतीपथावर आहेत. याशिवाय नाशिक विमानतळ, रिंग रोड, रेल्वे स्थानक, बस स्थानक इत्यादी पायाभूत सुविधांच्या श्रेणीवर्धनाची कामे पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.




