अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अल्पवयीन सावत्र मुलीशी तिच्या इच्छेविरूध्द वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा तसेच आई आणि मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार शहरातील एका उपनगरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात बुधवारी (27 ऑक्टोबर) फिर्याद दिली आहे. त्यानुसार सावत्र बापाविरूध्द पोलिसांनी अत्याचार, पोक्सो आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी महिलेचे (वय 32) पहिले लग्न 2012 मध्ये झाले होते. पहिल्या पतीपासून तिला मुलगी झाली. पहिल्या पतीसोबत सतत वाद होत असल्याने दोघे न्यायालयीन प्रक्रियेव्दारे विभक्त झाले. त्यानंतर 2021-22 मध्ये महिलेने आपल्या नात्यातील तरूणाशी नातेवाइकांच्या संमतीने दुसरे लग्न केले. या वेळी तरूणाचे पहिले लग्न झालेले होते. त्याची पहिली पत्नीही अहिल्यानगरमध्ये राहते. दुसर्या लग्नानंतर फिर्यादी महिला, तिची मुलगी (वय 13) आणि संबंधित तरूण यांच्यासह कुटुंब एकत्र राहत होते. या दाम्पत्याला एक मुलगाही झाला. फिर्यादीनुसार, डिसेंबर 2025 पासून संशयित हा मुलीशी अयोग्य वर्तन करीत होता. तिला नको त्या ठिकाणी स्पर्श करण्यासह तिच्या इच्छेविरूध्द शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप मुलीने आईकडे केला आहे.
यापूर्वी ते भाड्याच्या खोलीत राहत असताना हा प्रकार घडला. त्यानंतर दुसर्या ठिकाणी राहायला गेल्यानंतरही तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे तिने सांगितले. या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास तुला आणि तुझ्या आईला जीवे मारून टाकीन, अशी धमकी दिल्याचा आरोपही मुलीने केला आहे.
दरम्यान, 24 ऑक्टोबर रोजी पीडित मुलगी आपल्या आजीसोबत राहुरी तालुक्यातील एका गावात गेली होती. तेथे संशयित पोहोचला. तेथून नगरला परत येत असताना संशयिताने तिला हॉटेलमध्ये जाण्याबाबत विचारले. मात्र, तिने नकार दिल्यानंतर त्याने शिवीगाळ केल्याचे मुलीने आईला सांगितले. 27 ऑक्टोबर रोजी पीडिता घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.




