नाशिक। प्रतिनिधी Nashik
चाेरलेल्या पंधरा दुचाकीपैंकी नाशिक शहर व जिल्ह्यातील केवळ चार गुन्हे उघड झाले आहेत. ही कारवाई गुन्हेशाखा युनिट एकने शनिवारी(दि. १९) केली असून अकरा दुचाकींचे रेकाॅर्ड समाेर येत नसल्याने त्या बेवारस म्हणूण गणल्या जाणार आहेत. त्यामुळे दुचाकी मालकांनी कागदपत्रे घेऊन सरकारवाडा पोलिस ठाण्यात संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
शहर व परिसरात दुचाकी चोरीच्या घटना नित्याच्याच असून, दररोज एक ते तीन दुचाकी चोरीस जातात. अशातच चोरट्यांच्या शोधात असलेल्या गुन्हेशाखा युनिटने तिघांना ताब्यात घेतले आहे. एका विधीसंघर्षित बालकालाही ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून १० लाख ४० हजार रुपये किंमतीच्या १५ चोरीच्या दुचाकीही हस्तगत केल्या आहेत.
सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करतांना गुन्हे शाखा युनिट एकचे अंमलदार गोरक्ष साबळे, राम बर्डे, विलास चारोस्कर, आप्पा पानवळ यांना गुप्त माहिती मिळाली. संशयित दुचाकीवर छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील निलगिरी बाग येथे येणार असल्याचे कळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना माहिती दिली. त्यान्वये पथकाने सापळा रचून संशयित सत्यम ऊर्फ देवा मिलिंद गरुड (२१, रा. आमदार मळा,, माऊली चाळ, ओझर, ता. निफाड), साहिल आझाद शेख (२१, रा. दहाव्या मैलाच्या पुढे, टिळकनगर कॉलेजच्या बाजूला, भगतसिंग नगर, ओझर, ता. निफाड) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६० हजार रुपये किमंतीची चोरीची दुचाकी हस्तगत केली.
संशयितांच्या साथीदारांनी शहर व ग्रामीण भागातून एकूण पंधरा दुचाकी चोरी करून त्या विधीसंघर्षित बालक व खेडगाव येथील संशयित विकास बन्सीलाल कुमावत (२३, रा. ब्राह्मण गल्ली, खेडगाव, ता. दिंडोरी) यांच्याकडे विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. त्यानुसार संशयित कुमावत व विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेत त्यांच्याकडून नऊ लाख ८० हजार रुपयांच्या १४ दुचाकी जप्त केल्या. पंधरापैकी चार दुचाकींच्या चोरीचे शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून, उर्वरीत ११ दुचाकींबाबतची माहिती पोलीसांकडे उपलब्ध नाही.





