Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedकथा : पोरका

कथा : पोरका

तुकाराम चौधरी, नाशिक (मखमलाबाद)

सकाळ झाली तसा अंता जांभई देत उठला. काल दिवसभर बिल्डींगच्या कामाचा सिमेंट कालवून थकला होता. संध्याकाळी खूप शिण आल्यामुळे डाळ भात शिजवायलाही त्याला कंटाळा आला होता. कामावरून येतांना एक पाववडा सोबत आणला होता तो खाऊन पाणी पिवून तसाच झोपला होता.

- Advertisement -

आरे बापरे! आज उठायला थोडा उशीर झाला का काय? असे स्वतःशीच पुटपुटला. रात्री तो जेवला नव्हता त्यामुळे कदाचित आज त्याला सार्वजनिक शौचालयाकडे जाण्याची गरज वाटली नाही. नाशिक शहरात मजुरीसाठी आलेली माणसे पेठ नाका म्हणून ओळखल्या जाणार्‍या शहरातल्या या मुख्य रस्त्याच्या कडेला असणार्‍या मोकळ्या जागेत राहत होती. गेले पंधरा दिवस अंतानेही येथेच मुक्काम केला होता. तिथून फुले नगरच्या रस्त्याकडे सार्वजनिक शौचालयात यावे लागते. तिकडेच पिण्याच्या पाण्याचा एक नळ एक सार्वजनिक नळ होता. होता त्या नळावर खूप गर्दी होई. म्हणून अंता उठल्या उठल्या हंडा घेऊन तिकडेच निघाला होता.

नेहमीप्रमाणे रस्त्यावरून भरधाव वेगाने वाहनांची पळापळ सुरु होती. अंता पाण्याचा हंडा घेऊन पलीकडे घाईघाईत जाऊ लागला. तेवढ्यात रस्त्यावरून एक स्कूटरवाला भरधाव वेगाने येत होता. अंता रस्ता ओलांडून पलीकडे चालला होता.नळावर गर्दी आहे कि नाही हे पाहण्यासाठी त्याची नजर रस्त्याच्या पलीकडे होती. त्याच वेळी स्कूटरवाल्याने ब्रेक दाबल्याचा आवाज आला. अंता पटकन बाजूला सरकला तरीही अंताच्या हातातला पाण्याचा हंडा स्कूटरच्या हँडलला लागून लांब उडत गेला. स्कूटरवाला थोडा पुढं जावून थांबला. स्कूटरच्या हँडलचं काही नुकसान झालं नाही ना, हे त्यानं तपासलं अन मग अंताकडे वळून पाहात रागाने म्हणाला, आंधळा आहे का रे? धडकला असता ना आता गाडीला. मूर्ख साले, कुठनं कुठनं येतात शहरात?…

अंता एक शब्दही बोलला नाही. त्याची माफी मागून रस्त्याच्या दुभाजकाला अडकलेला हंडा पुन्हा उचलला अन नळावर गेला. नळावर थोडीच गर्दी असल्याने पाणी भरण्याचा लवकर नंबर लागला.

आज डाळ-भात शिजायला उशीर होईल म्हणून त्याने चुलीवर खिचडी शिजत ठेवली. त्याने तीन दगडांची एकच चूल केली होती. गेले पंधरा दिवस डाळ-भात नाहीतर खिचडी एवढंच करून खात होता अन हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असणार्‍या त्याच्या आईवडिलांनाही डाळ-भात नाहीतर खिचडी हेच डब्यात भरून नेऊन देत होता. त्याचे आईवडील खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे उपचार घेत होते. दोन दिवसांपूर्वी त्याच्या शेजारी राहात असलेल्या मजुरांकडून नागलीच्या भाकरी मागून त्याच्या आई-वडिलांसाठी घेऊन गेला होता. पण रोजच अशा भाकरी कुणाकडून मागाव्या?… म्हणून आपलं आपलं आणलेलं डाळ तांदळाच्या शिधापाण्यावर तो दिवस काढत होता. खरं तर रोजच भात-डाळ अन खिचडी खाऊन त्याला उबग आला होता. एक वर्षापूर्वी वसतिगृह चालू होतं तेंव्हा डीबीटीच्या मिळणार्‍या पैशातून त्याने खानावळ लावली होती. त्या जेवणाची त्याला आठवण येत होती. कोरोनामुळे कॉलेज बंद झालं तसं वसतिगृहही बंद झालं होतं. वसतिगृहाच्या जागी आता शासनाने कोविड सेंटर उभारलं होतं. अंता गावाजवळ असलेल्या हरसुल या गावी कर्मवीर भाऊसाहेब हिरेंच्या संस्थेत बारावी पास झाला होता. पुढील शिक्षणासाठी तो नाशिकला आला होता. एस.वाय.बी.ए.ला त्याने नाशिकच्या के.टी.एम. कॉलेजला अ‍ॅडमिशन घेतलं होतं. पण फस्ट इयरची परीक्षा होण्याच्या आतच कोरोना आला आणि शिक्षणाची वाताहात झाली. शिकणार्‍या पोरांची भविष्याची सुखद स्वप्न धुळीस मिळतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. अंताही वसतीगृह सोडून आठ ते नऊ महिने गावाकडे येऊन राहिला होता. आई वडीलांना तो एकटाच मुलगा. घरी जागा जमीन नव्हती. फॉरेस्ट विभागाच्या जंगलात एक पाच सहा गुंठ्याचा जमिनीचा तुकडा तेवढा होता. तिथे थोडी नागली पिकत होती. तो जमिनीचा तुकडाही मागच्या वर्षी जाणार होता. कारण शासनाने तो एरिया इको सेन्सिटीव्ह झोन म्हणून जाहीर केला होता. पण तेथल्या कम्युनिष्ट पार्टीच्या लोकांनी आंदोलन केलं. अन वनपट्ट्यात तात्पुरती शेती करण्यासाठी अनुमती मिळवली होती. पण आज ना उद्या उपजीविकेपुरता असणारा तो तुकडा हातातून निसटणार म्हणून त्याच्या आईवडिलांची इच्छा होती की अंताने शिकावं. नोकरीला लागावं म्हणून अंताला त्यांनी नाशिकला शिकायला पाठवलं होतं. वसतिगृहात नंबर लागल्यामुळे फारसा खर्च येणार नव्हता. अंताचे वडील रानातून बांबू तोडून आणून कधी टोपल्या, सूप, डालखे, दुरड्या, ताटके अशा वस्तू बनवून विकायचे. अंतालाही थोडेफार पैसे पुरवायचे पण आता इको सेन्सिटिव्ह झोनमुळे रानातली एक फांदी तोडली तरी कारवाई होणार होती. त्यामुळे अंताच्या आईवडिलांना कुठेतरी मोलमजुरी करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.

एक दिवस अंताचे आईवडील असेच वाळलेली लाकडे शोधण्यासाठी भर उन्हात रानात गेले होते. कारण भर उन्हात फॉरेस्ट खात्याचे शिपाई फिरत नसतात. वाळलेली लाकडे शोधता शोधता तहान लागली म्हणून जनावरे पीत असलेल्या रानातल्या झिर्‍याचे गढूळ पाणी प्याले. अंगाची लाही लाही होणार्‍या उन्हात परत आले. त्यावर दोनच दिवसांनी दोघेही आजारी पडले. अंगात ताप भरला होता. सर्दीही झाली होती. अंताचे आई वडील सांगायचे आम्ही घरीच उपचार करून नीट होऊ. जरा दम धर. घाबरू नको. सालातून एक बार तरी सर्दी, पडसां, ताप येतोच त्यात काय एवढा घाबरण्यासारखां? असे अंताचे आई-वडील त्याला म्हणत होते. पण अंता ऐकत नव्हता. त्याला रिस्क घ्यायची नव्हती. म्हणून त्याने गावाजवळ असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी त्याच्या आई-वडीलांना नेले तर तिथे आधी कोरोनाची टेस्ट करायला लावली. दोघांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मग अंता घाबरला. त्याच्या आई-वडिलांना नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले पण तिथे उपचारासाठी लवकर बेड मिळेना. तेंव्हा अंताला कोणीतरी सांगितलं की खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले तर लवकर बेड मिळेल. अंता मोबाईलवर कोरोनाच्या बातम्या रोजच पाहात होता. रोज कोरोनाचे पेशंट दगावत होते. आई बाबांना कोरोना आपल्यापासून हिरावून घेऊन जाणार तर नाही ना अशी अंताच्या मनात भीती होती म्हणून काहीही करून आपल्या आई बाबांना वाचवायलाच पाहिजे यासाठी त्याने त्याच्या आईवडिलांना नाशिक शहरातल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्या हॉस्पिटलवाल्यांनी वीस हाजार रुपये अ‍ॅडव्हान्स मागितला. अंताकडे पैसे नव्हते. त्याला मदत करण्यासारखंही कोणी परिचयाचे नव्हतं. तो त्याच्या एका मित्राबरोबर त्यांच्या मतदारसंघातल्या आमदाराकडेही जावून आला होता. आमदार म्हणाला होता, आभाळच फाटलंय त्याला आम्ही तरी कुठे कुठे ठिगळ लावू? रोजच मदत मागणार्‍यांची रांग लागतेय. मी काही बँक नाही ना? जरा आम्हालाही समजून घ्या.

आता कुठे जावे? पैसे कुठून आणावे? या विचारात अंता पडला. त्याचे खिशातल्या अँड्रॉइड मोबाईलकडे लक्ष गेले. तीन वर्षांपूर्वी त्याने एकाकडून तो चार हजार रुपयांना विकत घेतला होता. त्याचे दोन अडीच हाजार रुपये तरी येतील असा विचार त्याने केला. मोबाईल काय दुसरा घेता येईल. आई बाबा वाचले पाहिजेत म्हणून तो मोबाईल विकण्यासाठी रस्त्याने निघाला होता तेवढ्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या मजुरांच्या वस्तीच्या ठिकाणाकडे त्याचे लक्ष गेले. त्याला माहित होतं लोकं कामासाठी गावाकडून शिधापानी घेऊन येतात. काही काही तर कामाच्या मालकाकडून उचलही घेतात अन मग काम करून फेडतात. आपल्यालाही अशी उचल घेऊन काम करून फेडता येईल. कामाची चौकशी करावी लागेल म्हणून अंता त्या मजुरांच्या बाचके ठेवलेल्या ठिकाणी गेला. तिथले बरेचसे मजूर कामावर निघून गेले होते. फक्त दोनचार लहान मुले एक म्हातारा अन एक दहा अकरा वर्षाची मुलगी तिथे होते. त्याने तेथल्या त्या म्हातार्‍या माणसाजवळ इथली माणसे कुठे कुठे कामाला जातात याची चौकशी केली. ज्या ठिकाणी बिल्डींगचे काम चालू होते. तिथला पत्ता त्या म्हातार्‍या माणसाने देताच तिथे जावून अंताने काम मिळवले. वीस हजार रुपये उचल घेऊन हॉस्पिटलमध्ये नेऊन भरली.

ती उचल फेडण्यासाठी आता अंता त्या बिल्डींगच्या कामावर जाऊ लागला होता. त्याने गावाकडून थोडे डाळ तांदूळ अन सरपण फाट्या आणल्या होत्या. तो राहात होता तिथून बिल्डींगचे काम जवळ होते. तेथे पायी चालत जाणे शक्य होते पण त्याचे आई-वडील ज्या हॉस्पिटलमध्ये होते ते लांब होते. रोज सकाळी आधी आई-वडीलांना डबा देऊन मग तसाच कामावर जायचा. संध्याकाळीही कामाची सुट्टी झाली कि डबा घेऊन जायचा. असा त्याचा आता दिनक्रम सुरु झाला होता. कामाच्या ठिकाणाहून हॉस्पिटल लांब असल्यामुळे रोज जायला वीस अन यायला वीस असे चाळीस रुपये रोज खर्च होत होते.

खिचडी शिजली तसा अंताने पटकन डबा भरला. कामाला जायच्या वेळेच्या आत हॉस्पिटलमध्ये डबा पोचवून यायचे होते. झपझप चालत तो रिक्षा थांबणार्‍या नाक्यावर आला तसा भपकन मसालेयुक्त भाज्यांचा वास आला. नाक्याजवळच असणार्‍या हॉटेलमधून तो वास येत होता. त्याने तो वास नाकातून भरभरून घेतला.

च्यायला, या वासानेच पोट भरले असते तर किती मस्त झाले असते?… पण साल्या या नफेखोर लोकांनी मग वासही विकला असता. मग तो वास घ्यायलाही मग आमच्यासारख्या लोकांकडे पैसे नसते. त्याच्या मनात असे काहीही विचार यायला लागले.

त्याने नाकावरचा मास्क सरकवून पुन्हा तो वास पोटात भरून घेतला. पण आपण उगीचच वेड्यासारखे काहीही विचार करतोय. वासाने कधी पोट भरत नसते हे त्याच्या लक्षात आले. त्या वासाने त्याच्या पोटातली भूक मात्र चाळवली गेली होती. त्याला हॉटेलमध्ये जावून काहीतरी सुग्रास खाण्याची तीव्र इच्छा झाली पण त्याच्याकडे त्या हॉटेलमधले पदार्थ विकत घेण्याइतपत पैसे तरी कुठे होते? कोरोना काळात हॉटेल्स बंद असले तरी हॉटेलांमधून पदार्थ विकत घेऊन पार्सल नेण्याची परवानगी शासनाने दिली होती. मात्र ते हॉटेल पाचशेरुपयाच्या वर बिल झाले तरच पार्सल देत होते. तसं पाहिलं तर वीस-तीस रुपये किमतीचे पदार्थ त्या हॉटेलमध्ये नव्हतेच म्हणून अंता बाहेरचं काही खायची इच्छा झाली तर दहा रुपयाच्या पाववड्यावर भागवत होता. खरं तर कष्ट करून झालेली शरीराची झीज भरून काढण्यासाठी त्याला काहीतरी चांगला प्रथिनयुक्त, उष्मांक वाढविणारा आहार घ्यायला पाहिजे होता. अन त्याच्या आई वडिलांनाही हॉस्पिटलमध्ये इम्युनिटी वाढविणारा आहार पुरविणे गरजेचे होते, पण तो कुठून मिळणार? घरून आणलेले डाळ, तांदूळ यावरच त्याचा रोजचा गुजारा चालला होता. चांगलंचुंगलं खायला बघितलं तर पैसे कसे वाचणार? हॉस्पिटलचं बिल कसं भरणार? या विचाराने चांगलं काही खाण्याची इच्छा झाली तरी ती इच्छा त्याला मारावी लागत होती.

पंधरा दिवसांपूर्वीच त्याचे आई वडील दोघेही कोरोना पौझिटिव्ह झाले होते. नाशिकच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांना अ‍ॅडमिट केले होते. सरकारी सिव्हील हॉस्पिटलमध्ये बेड न मिळाल्याने त्याने खाजगी हॉस्पिटलमध्ये आई वडिलांना ठेवले होते. वीस हजार रुपये अडव्हान्स भरला होता. एका बिल्डरच्या हातापाया पडून त्याने वीस हजाराची उचल घेतली होती. ती फेडण्यासाठी आता तो त्या बिल्डरच्या इमारतीच्या बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी काम करत होता. कोरोनामुळे गावाकडून आलेले बरेच मजूर घरी गेले होते. शहरातल्या मोकळ्या जागी,रस्त्यांच्या कडेला राहणार्‍या बर्‍याच मजुरांना पोलिसांनी हुसकावून लावले होते. त्याचा बिल्डींगसारख्या बांधकामांवर परिणाम होत होता. अंताला तेवढं तरी बरं तिनशे रुपये रोजानं काम मिळालं होतं. नाहीतर हॉस्पीटलचं बिल तो कसा भरू शकला असता?

हॉटेलच्या बाजूलाच चहा व वडापाव विकणारयांचे गाडे होते. कोरोनामुळे त्यांना सकाळी सात ते दोन वाजेपर्यंतच परवानगी होती. अंताने त्या वडापावच्या गाड्यांवरून एक नजर फिरवली. एखादा पाववडा खावा काय?… त्याची तीव्र इच्छा झाली. उशीर झाला म्हणून आजही सकाळी तो जेवला नव्हता.

अंताने खिशात हात घातला. पन्नास रुपयाची नोट काढली. जायला दहा यायला दहा. म्हणजे आता वीस अन संध्याकाळी वीस असे रिक्षाला चाळीस रुपये जातील. म्हणजे दहा रुपये उरतात. दहा रुपयाला एक वडापाव मिळतो. बस!… त्याने एक वडापाव विकत घेतला. खाण्यासाठी तोंड उघडलं तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं. आरे आपण तर असं काहीही विकत घेऊन खाणार. पण हॉस्पिटलमध्ये असलेल्या आई बाबाचं काय? खरं तर त्यांची इम्युनिटी पावर वाढविण्यासाठी त्यांना असे काहीतरी वेगळे पदार्थ अन फळे वगैरे घेऊन द्यायला पाहिजे. पण साला आपण असे कफल्लक! पाववडा विकत घेण्यापुरतीच आपली आर्थिक ताकद. असू दे! पाववडा का होईना पण याची गरज माझ्यापेक्षा आई-बाबांना जास्त आहे. बिचारे, आठ दहा दिवसांपासून फक्त बिना फोडणीची उडदाची डाळ अन भात खात आहेत. पण मी तरी काय करू शकतो? जे उपलब्ध आहे तेच तर त्यांना पुरवू शकतो. त्यानेच त्याच्या मनाची अशी समजूत घातली.

विचारांच्या तंद्रीतच अंता हॉस्पिटलच्या गेटवर पोचला. त्याने तो पाववडा व खिचडीचा डबा वॉचमेनकडे दिला. वॉचमनने त्यावर भरपूर सॅनीटायझर फवारले. ते पाहिल्यावर अंता मनातल्या मनात म्हणाला, या सॅनीटायझरने कोरोनाचे जंतू मरत असतील तर त्याचेच औषध का बनवत नाहीत? नाहीतर सॅनीटायझरच का फवारत नाहीत माणसाच्या घशात? खरं तर कोरोनाने जसा प्रत्येक माणूस वैतागला होता तसा अंताही वैतागला होता. त्यामुळे तो कधी कधी स्वतःशीच असा विचित्रपणे स्वतःशीच पुटपुटत असे.

हॉस्पिटलच्या आत जावून पेशंटला भेटण्यास मनाई होती. भेटायचेच असेल तर हॉस्पिटलने पुरविलेला पिपिई कीटचा ड्रेस अंगात घालून मग जावे लागे पण या पिपिई कीटचे आधी पैसे भरावे लागत जे अंता भरू शकत नव्हता. गेले आठ दहा दिवस त्याने आपल्या आई बाबांना डोळ्याने पाहिले नव्हते. वॉचमनने फोन करून आतल्या हॉस्पिटलच्या शिपायाला बोलावले. त्या शिपायाने आधी दिलेला डबा आणून दिला व हा भरलेला डबा आत घेऊन जावू लागला. तेवढ्यात अंता जोरात म्हणाला, ओ काका एक मिनिट… तसा तो शिपाई पुन्हा गेटसमोर आला अन दुरूनच म्हणाला, काय झालं?

अंता म्हणाला, नीट जेवतात का हो आईबाबा? त्यांची तब्येत आता कशी आहे?

त्या शिपायाने अंताकडे नीट निरखून पाहिले अन मग म्हणाला, तू एकटाच आहेस का?

नाही. एक बहीण आहे. लग्न होऊन गेलेय पण तुम्ही एकटाच आहेस असं का विचारता? अंता म्हणाला.

रोज तूच डबा घेऊन येतोस. तेही फक्त डब्यात डाळ-भात घेऊन. आता विचारलंस म्हणून सांगतो. नुसत्या डाळ भाताने तुझे आई वडील कसे सुधारतील? एवढे बोलून अंताचं पुढचं काही बोलणं ऐकायच्या आतच तो शिपाई वेगाने आत निघून गेला. अंता मिनिटभर तेथेच थांबून राहिला. त्याला अजून आई-बाबांची खूप चौकशी त्याच्याकडे करायची होती.

दुसर्‍या दिवशी जेंव्हा अंता डबा घेऊन गेला तेंव्हा त्याला पिपिई कीट देऊन आत घेण्यात आलं. त्याच्या आई-बाबांना कृत्रिम ऑक्सिजन पुरविण्यात आला होता. त्याला आई-बाबांची भेट घेता आली. त्याचा त्याला आनंद झाला पण त्यांची श्वासासाठी चाललेली तळमळ पाहून दुःख दाटून आलं. अंताला हॉस्पिटलच्या पैसे भरण्याच्या केबिनजवळ बोलाविण्यात आलं. तेथे त्याला एक लाख तीस हजाराचं बिल देण्यात आलं.

एवढं बिल? अंता चाचरत म्हणाला.

होय, तुम्ही आधी दिलेले वीस हजार. अन हे एक लाख तीस हजार. आतापर्यंत असे एकूण दीड लाखाचं बिल झालंय. हे दोन दिवसात भरा. अन्यथा पुढचा उपचार होणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलंय. केबिनमध्ये बसलेली ती लेडीज म्हणाली.

अहो मॅडम पण एवढे पैसे?… एवढे पैसे नाहीत माझ्याजवळ. अंता म्हणाला

अहो, पैसे नाहीत असं म्हणून चालत नाही. तुम्हाला पैसे भरावेच लागतील. ती लेडीज म्हणाली.

मॅडम, खरं सांगतो. खरंच एवढे पैसे नाहीत हो माझ्याजवळ. अंता असं म्हणाला तशी ती लेडीज अंताकडे डोळे मोठे करून पाहायला लागली.

तुम्ही मला आता काहीच सांगू नका. वाटल्यास डॉक्टरांना भेटून घ्या. असं ती लेडीज म्हणाली अन अंताकडे पाठ करून काऊंटरमधील एक फाईल घेऊन चाळू लागली.

अंता डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांना बिल दाखवत म्हणाला, डॉक्टरसाहेब मी गरीब आहे हो. एवढे पैसे नाय भरू शकत.

डॉक्टरांनी त्याच्या हातातले बिल पाहिले अन मग म्हणाले, पैसे भरल्याशिवाय पुढचे उपचार करणे आम्हांलाही शक्य नाही. नाहीतर मग तुमचे पेशंट घेऊन जावू शकता.

नाय, नको डॉक्टर असं म्हणू नका. मी पैसे भरेन पण हे लाखाच्या वरचं बिल? मी एवढे पैसे कुठून आणू? काहीतरी कमी करा डॉक्टर. अंता गयावया करत म्हणाला.

इथं का काही खरेदी विक्री करण्यासाठी तू आला आहेस काय? का आम्ही काही धंदा टाकून बसलोय इथे? पैसे वाचविण्यासाठी सगळे असेच बोलतात. जा पैसे घेऊन ये जा. आम्हाला आता तुझ्याशी बोलत बसायला वेळ नाही. आमचा वेळ बरबाद करू नकोस. तो डॉक्टर एकाएकी आवाज चढवून बोलला.

अंता खिन्न मनाने परत आई-वडिलांजवळ गेला. सर्व परिस्थिती कथन केली. आई वडील काहीच बोलले नाहीत. दोघांच्याही डोळ्यात अश्रुंचे पाणी तेवढे डबडबलेले होते. अंता काही वेळ तेथेच विचार करत उभा होता. एवढ्यात त्याच्या आईने त्याला हात हलवून जवळ बोलवले. अन गळयातळे मंगळसूत्र काढून त्याच्या हातात दिले. अंता म्हणाला, आई नको. मी काहीतरी करतो. आईने हात जोडून मुकाट्याने विनवणी केली. मग त्याच्या वडिलांनीही जवळ बोलवले. वडील म्हणाले, आता एवढं पयसं झालंत. ते भरलेशिवाय हे सोडणार नाय. तू घरी जाय अन आपलां घर इक.

वडिलांचे हे बोल ऐकून अंताला दरदरून घाम फुटला. अंता घर विकायला तयार होईना पण वडील म्हणाले, जगलू वाचलू तर आपण दुसरा घर बांधू.

अंता हॉस्पिटलच्या बाहेर आला. त्याने त्याच्या शहरात राहणार्‍या एका मित्राला एकदोन दिवस हॉस्पिटलमध्ये असणार्‍या त्याच्या आई वडीलांना डबा पुरविण्याची विनंती केली. मित्राने तशी तयारी दाखविल्यावर अंता कामाच्या ठिकाणी असलेलं साहित्य घेऊन घरी आला. घर विकण्याला त्याचं मन तयारच होत नव्हतं. आई बाबांवाचून घर सुनंसुनं वाटत होतं. तो चुलीजवळ गेला. त्या चुलीकडे अन त्याची आई ज्या लाकडी पिढ्यावर बसून भाकरी थापटायची त्याकडे बराच वेळ एकटक होऊन बघत राहिला.

इथंच आपली आई बसून भाकरी करायची. त्या चुलीजवळ लाकडी पिढ्यावर बसून आई भाकरी थापते आहे याचा त्याला क्षणभर भास झाला. आईची आठवण येऊन दुःखाचा आवंढा त्याच्या गळ्यात दाटून आला.मग तो बाहेरच्या ओसरीवर आला. लहानपणी कुडाला भार टेकून जिथं तो अभ्यास करायचा ती जागा त्याने एकदा मन भरेस्तोवर पाहून घेतली. मग तो अंगणात आला. अंगणात बसून त्याचा बाप बसून सूप, डालखे… अशा बांबूच्या वस्तू बनवायचा तीही जागा त्याने पाहून घेतली. तिथे एक अर्धवट विणलेली टोपली तशीच पडून होती. ते घर म्हणजे नुसते घर नव्हते. अनेक जिवंत भावना त्या घराशी जुळलेल्या होत्या. घर विकायच्या विचाराने त्याला रात्रभर झोप आली नाही पण पैसे उभे करण्याचा आता त्याच्याजवळ दुसरा पर्यायही नव्हता.

दुसर्‍या दिवशी सकाळी अंता गावच्या सरपंचाकडे गेला. घर विकायचे आहे. रोख पैसे देईल असे कोणीतरी गिर्‍हाईक पहा. असे सांगितले. तेंव्हा सरपंच म्हणाला, आपल्या गावात तुमचे घर विकत घेईल असं कोणीही नाही. घर विकत घेण्याची कोणाला गरजही नाही अन तेवढा पैसाही नाही. हरसूलचा एखादा व्यापारी तुमच्या घराला असलेल्या सागाच्या लाकडांमुळे विकत घेईल तर विचारून पाहतो, असे सरपंच म्हणाला अन मग त्याने एकदोन व्यापार्‍यांना फोन लावले तेंव्हा एक जिलादिनभाई घर पाहायला येण्यास तयार झाला. जिलादिनभाईचा फर्निचरचा धंदा होता.

जिलादिनभाईने घराचे निरीक्षण केल्यानंतर एक लाख किमत देऊ केली. पण गावचा सरपंच व आणखी काही एकदोन माणसे घराचा सौदा करतांना तेथे उपस्थित होती. त्या माणसांनी व सरपंचाने अंताच्या बाजूने बोलून शेवटी दीड लाखात घराचा सौदा फायनल केला. घराला सागाची भरपूर लाकडे होती. आता सागाचं लाकूड म्हणजे सोनं झालं होतं. ती सागाची लाकडे, घरावरची कौले, जोत्याच्या दगडा या सर्वांसहित जिलादिनभाईला दीड लाखात ते घर महाग पडले नाही. त्याने लगेच अंताला दीड लाखाचा चेक लिहून दिला.

अंताने तो चेक बँकेत नेऊन वटवला अन पैसे घेऊन तो हॉस्पिटलमध्ये भरायला गेला. अंताने पैशांचं पुडकं काउंटरवर ठेवलं. तिथल्या नर्सने एक फॉर्म भरायला दिला. त्याने तो घाईघाईत भरून सही करून दिला. अंता त्याचे आईवडील असलेल्या वॉर्ड रूमकडे जाण्यसाठी वळला तोच ती नर्स म्हणाली, ओ थांबा, तुमचे आई वडील तिकडे नाही. ही बिल भरल्याची चिठ्ठी घ्या. तिथे डॉक्टरांना दाखवा. तिकडे त्या शीतकपाटात तुमचे आई वडिलांच्या बॉडीज आहेत.

विजेचा झटका बसावा तसा अंताच्या सर्वांगाला झटकाच बसला. एकाकी त्याच्या घशाला कोरड पडलली.

क… काय म्हणता?… इतकेच कसेबसे तो त्या नर्सकडे बघून म्हणाला.

होय कालच ते दोघेही गेले. तुमच्याशी संपर्क झाला नाही. ती नर्स म्हणाली.

अंताच्या नसानसातून संतापाची उसळी आली. तसा तो त्या नर्सला म्हणाला, मग काय झक मारायला माझ्याकडून एवढं बिल घेतलं?…तुम्हाला जर माझ्या आई-वडिलांना वाचवायचंच नव्हतं तर मला पैसे आणायला पाठवायचंचं नव्हतं ना… नाहीतर दाखल करूनच घ्यायचंच नव्हतं… लुटारू साले!…

अंताचं असं संतापजनक बोलणं ऐकून नर्सने वॉचमेनला बोलावलं. वॉचमेनने अंताला बाहेर नेले. थोड्या वेळाने त्याचा राग शांत झाल्यावर त्याच्या आई वडिलांच्या प्रेताबरोबर त्याला शहरातल्या विद्युतदाहिनी स्मशानाजवळ नेण्यात आले. अंताला आई वडिलांचे शेवटचे मुखदर्शनही घेता आले नाही. प्लास्टिकच्या पिशवीत त्यांचं प्रेत पूर्णपणे लपेटण्यात आले होते. कोणत्याही अंत्यसंस्काराविना आई-वडिलांना विद्युतदाहिनीत जाळण्यात आले.

अंता त्या स्मशानभूमीपासून निघाला खरा पण आता कुठे जायचे?… कोणाकडे जायचे?… आता या जगात आपलं म्हणावं असं कोण आहे?… या प्रश्नांनी त्याचे त्याचं डोकं भणभणत होते.

या कोरोना काळात माणसं एकमेकांकडे खूप शंकेने पाहत होती. काय सांगावं, समोर आलेला माणूस कोरोना पेशंट असेल तर?… अशी शंका प्रत्येकाला येऊ लागली होती. एकमेकांच्या सहवासात असलेले नवरा-बायको, मुलं यांच्यातही कोरोनाच्या शंकेने दरी निर्माण केली होती. एकमेकांसाठी मरण्याच्या शपथा घेऊन माझं किती प्रेम आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करणारे प्रियकर-प्रेयसी हे ही कोरोनाच्या धास्तीने एकमेकांच्या जवळ जात नव्हती. अशात परके माणूस तर सोडूनच द्या. माणसाच्या मरणापायी माणसातली माणुसकी, प्रेम, जिव्हाळा,आपुलकी संपते कि काय याचा संभाव्य धोकाही वाटू लागला होता.

अंता वेड्यासारखा रस्ता दिसेल तिकडे वेड्यासारखा नुसता चालत सुटला होता. आपण नेमके कुठे जातोय याचेही भान त्याला नव्हते. त्या शहरातल्या कोरोना प्रतिबंधित एरियात अंता चालत चालत गेला. आई-वडिलांच्या वियोगाने डोळ्यांतून अश्रूही सारखे ओघळत होते. डोळ्यांतून ओघळणारे अश्रू पुसण्याच्या नादात त्याच्या चेहर्‍यावरचा मास्क कुठे ओघळून पडला हेही त्याला कळले नाही. शहरात नाकेबंदी असणार्‍या ठिकाणी तो पोचताच पोलिसांनी त्याला हटकले. त्याच्या पाठीमागे पायाच्या पोटर्‍यावर अन पाठीवर चारपाच रट्टे दिले. कुठे जातो?… मास्क का लावला नाही?… असे प्रश्न विचारले. अंता काहीच बोलला नाही. मार खावून घेतला. आई वडिलांच्या वियोगाच्या वेदनेपुढे पोलिसांच्या माराच्या वेदना त्याला फिक्क्या वाटत होत्या. मास्क लावला नाही म्हणून पोलिसांनी त्याच्याकडून दोनशे रुपायाची पावती फाडून घेतली. अन पुन्हा असा बिना मास्क व बिना कामाचा फिरू नको. तुझ्याबरोबर इतरांना धोक्यात घालू नको असा दम देऊन पोलिसांनी त्याला चल पळ इथून असे सांगितले.

अंता तिथून निघाला खरा. पण तो आता कोणाकडे जाणार होता?… तो पोरका झाला होता.

तुकाराम चौधरी, नाशिक (मखमलाबाद)

मो. 8262870432

- Advertisment -

ताज्या बातम्या