Friday, May 3, 2024
Homeनगरएस.टी.पी. प्लांट कृती समितीचे कार्यकर्ते आक्रमक

एस.टी.पी. प्लांट कृती समितीचे कार्यकर्ते आक्रमक

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

एस.टी.पी प्लांट बाबत चर्चा करण्यासाठी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी बोलाविलेल्या बैठकीकडे एस.टी.पी प्लांट स्थलांतर कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली. या बैठकीस उपस्थित राहिलेल्या नगरसेवकांविरुद्ध मुस्लिम बांधवांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

- Advertisement -

एस.टी.पी प्लांटची जागा जोपर्यंत बदलली जात नाही तोपर्यंत नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मुस्लिम प्रभागांमध्ये काँग्रेसची एकही बैठक घेऊ नये अशा शब्दात मुस्लिम बांधवांनी संबंधित पदाधिकार्‍यांना सुनावले आहे. यामुळे शहरातील वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संगमनेर शहरातील जोर्वे नाका परिसरात संगमनेर नगर परिषदेच्या माध्यमातून एस.टी.पी प्लांट बांधण्यात येणार आहे. या प्लांट मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार असल्याची भीती प्रकल्पाच्या परिसरातून व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पाची जागा बदलावी यासाठी परिसरातील नागरिक आक्रमक झाले आहे. तब्बल दीड महिन्यापासून या नागरिकांनी एस.टी.पी प्लांट स्थलांतरित समितीच्या नेतृत्वाखाली बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एस.टी.पी प्लांट मुळे वादंग निर्माण झाला आहे. या प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी काल बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीस एस.टी.पी प्लांट कृती समितीचे पदाधिकारी अनुपस्थित होते. मुस्लिम समाजाचे निवडक पदाधिकारी व माजी नगरसेवक या बैठकीस उपस्थित होते. बैठकीसाठी उपस्थित राहू नये असा मुस्लिम समाजाचा आग्रह असतानाही या नगरसेवकांनी बैठकीस हजेरी लावल्याने या नगरसेवकाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कोणीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तरी एस.टी.पी प्लांटची जागा बदलली जात नाही तोपर्यंत आम्ही साखळी उपोषण सुरू ठेवणार असून संगमनेर ते मंत्रालय असा पायी मोर्चा ही काढणार आहोत, असा इशारा एस.टी.पी प्लांट स्थलांतर कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

दरम्यान या बैठकीसाठी उपस्थित राहिलेल्या नगरसेवकांच्या घरी जाऊन कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध केला. जोपर्यंत एस.टी.पी प्रकल्पाची जागा बदलली जात नाही तोपर्यंत आपल्या परिसरात काँग्रेसची बैठक घेऊ नये असा इशारा यावेळी संबंधित पदाधिकार्‍यांना देण्यात आला. संगमनेर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरात विविध ठिकाणी बैठका घेण्यात येत आहे. एस.टी.पी प्लांट स्थलांतर कृती समितीच्या आक्रमक भूमिकेमुळे या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. आमदार थोरात हा प्रश्न कसा सोडवतात याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या