सार्वमत
नवी दिल्ली – चीनच्या प्रयोगशाळेतूनच करोना विषाणूचा प्रसार झाला असल्याचे आमच्याकडे सबळ पुरावे आहेत असा दावा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी केला आहे. अमेरिकेतील एबीसी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
करोनाने जगभरात थैमान घातलं असून सर्वात मोठा फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिका करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत असूनदेखील अद्याप नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करोनाच्या फैलावासाठी वारंवार चीनला दोषी ठरवत असून जाहीरपणे आरोप करत आहेत. ते सतत चीनवर टीका करत असून आपल्याकडे माहिती असूनही ती लपवली असल्याचा आरोप केला आहे. सोबतच चीनला जबाबदार धरलं पाहिजे अशी मागणी करत आहेत. माइक पोम्पिओ यांनी यावेळी चीनने जाणुनबुजून करोना विषाणूचा चा फैलाव केला का यासंबंधी बोलणं मात्र टाळलं.
माइक पोम्पिओ यांनी एबीसी वृत्तवाहिनीशी बोलताना अमेरिकेतील गुप्तचर विभागाच्या माहितीशी आपण असहमत असल्याचं सांगितलं आहे. ज्यामध्ये हा व्हायरस मानवनिर्मित किंवा विकसित करण्यात आला नसल्याचं सांगण्यात आलं आहे. अनेक तज्ञांनी हा व्हायरस मानव निर्मित असल्याचं सांगितलं आहे. त्याच्यावर विश्वास न ठेवण्यासारखं कोणतंही कारण मला दिसत नाही, असं त्यांनी सांगितलं आहे. गुप्तचर विभागाची माहिती चुकीची आहे, व्हायरस चीनच्या प्रयोगशाळेतून बाहेर पडल्याचे सबळ पुरावे असल्याचं ते म्हणाले आहेत. मला वाटतं आता संपूर्ण जग सत्य पाहू शकतं. चीनने याआधीही जगाला असे अनेक आजार दिल्याचा आणि कमी दर्जाच्या प्रयोगशाळा सुरु केल्याचा इतिहास आहे, असंही ते म्हणाले.
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी गुप्तचर विभागाला करोनाचा फैलाव नेमका कुठून झाला आहे यासंबंधी तपास करण्याचा आदेश दिला आहे. सुरुवातीला हा व्हायरस वुहानमधील बाजार जिथे वटवाघूळ सारखे प्राणी विकले जात होते तेथून झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र आता हा व्हायरस चीनच्या प्रयोगशाळेतूनच बाहेर आल्याची जास्त शक्यता वर्तवली जात आहे.




